नाशिक : एकीकडे राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यासाठी, तसेच मतदारसंघातील विकासकामे जास्तीत जास्त मंजूर होण्यासाठी आमदार धडपडत असताना दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मात्र त्यांच्या मतदारसंघातील मंजूर असलेली लाखो रुपयांची सीमेंट प्लग बंधाऱ्यांची कामे रद्द करण्यासाठी जिल्हा परिषदेला पत्र दिल्याने तो एक चर्चेचा विषय बनला आहे.विशेष म्हणजे या पत्रात पाच कामे रद्द करण्यासाठी संगणकाने यादी तयार केलेल्या पाच कामांचा उल्लेख असताना प्रत्यक्षात लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला दिलेल्या आमदारांच्या पत्रात हस्तक्षराने सहाव्या कामाचे नाव टाकण्यात आल्याने हे हस्ताक्षर नेमके कोणाचे? आमदाराच्या पत्राचा कोणी दुरुपयोग केला का? याबाबत उलटसुलट चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.हा सर्व प्रकार म्हणजे ई-निविदेच्या घोळातून घडल्याची दबक्या आवाजात जिल्हा परिषदेत चर्चा आहे. दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा, तळ्याचा पाडा, वनारे, मोहाचा पाडा यांसह पाच कामे रद्द करण्याबाबतचे पत्र आमदारांनी दिले आहे. या पाच कामांमध्ये तळ्याचा पाडा येथील १५ लाखांचा सीमेंट प्लग बंधारा रद्द करण्याची मागणी आमदारांच्या पत्रात करण्यात आलेली असली या पत्रात पाच कामे रद्द करण्याचा उल्लेख असला तरी या पाच कामांच्या यादीत हस्ताक्षरात तळ्याचा पाडा येथील २१ लाखांंचे सीमेंट प्लग बंधाऱ्याचे कामही रद्द करण्यात यावे, असे म्हटले आहे. त्यामुळे हे हस्ताक्षर नेमके कोणाचे? असा प्रश्न लघुपाटबंधारे विभागाला पडला आहे. शिवाय गेल्या दोन महिन्यांपासून या कामाबाबत निविदा प्रसिद्ध झालेली असताना काही मक्तेदारांच्या ‘माघारी’ नाट्यामुळेच अद्यापपर्यंत या कामांच्या निविदा उघडण्यात आल्या नव्हत्या. आता तर थेट आमदार नरहरी झिरवाळ यांनी ही सुमारे ८० ते ९० लाखांंची कामे शेतकऱ्यांनी जागा नसल्याचे सांगितल्याने रद्द करण्यात यावीत, असे पत्र लघुपाटबंधारे विभागाला दिल्याने विभागाची गोची झाली आहे. (प्रतिनिधी)
आमदाराच्या पत्राचा उलटा ‘प्रवास’?
By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST