मालेगाव : येथील अक्सा कॉलनी भागात सहा महिन्यांपासून घरफोड्या व चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करताना नागरिकांनी चोरट्यास रंगेहाथ पकडून आयेशानगर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलिसांनी इम्रान शेख खालीद (२१), रा. आझादनगर, धुळे व त्याचे दोन साथीदार अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रियाज कुतुबुद्दीन शेख (४८) यांनी फिर्याद दिली.अक्सा कॉलनीतील सर्वे नं. २३०/१/१ प्लॉट नं. ३१ येथील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करताना तेथील नागरिकांनी रंगेहाथ पकडून त्यास आयेशानगर पोलिसांच्या ताब्यात दिले तर दोन जण फरार झाले. अक्सा कॉलनीत दर दिवसाआड घरफोड्या होत असून याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिस निरीक्षकांसह पोलिसांनी या भागात भेट देऊन नागरिकांना मार्गदर्शनही केले होते मात्र चोर पकडण्यात पोलिसांना अपयश येत होते. अक्सा कॉलनीतील नागरिकांनी पाळत ठेवून भल्या सकाळी चोरट्याला पकडून यथेच्छ चोप दिला. त्यानंतर आयेशानगर पोलिसांना कळविण्यात आले. सात सव्वा सात वाजेच्या सुमारास पोलिस वाहन दाखल झाले. पोलिसांनी चोराच्याा मुसक्या आवळून पोलिस ठाण्यात नेले. मंगळवारी सकाळी आठ ते आज सोमवार १२ आक्टोबरच्या सकाळी सात वाजेदरम्यान ही घटना घडली. अधिक तपास आर. बी. कोळी करीत आहेत.दरम्यान पोलिसांनी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करून वाढत्या चोऱ्यांना पायबंद घालावा, रात्रीची पोलिस गस्त वाढवावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
मालेगाव येथे घरफोडीचा प्रयत्न
By admin | Updated: October 12, 2015 23:03 IST