मनमाड : अतिरेक्यांकडून भिकारी तसेच बनावट खाद्य विक्रेत्यांच्या वेशात प्रमुख रेल्वेस्थानकावर घातपात घडवून आणण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली असून त्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर डॉग स्कॉडच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यासाठी बैठक घेण्यात आली.सध्या राज्यातील प्रमुख रेल्वेस्थानक तसेच रेल्वेमार्गावर घातपाती कारवाया घडवल्या जाण्याची शक्यता असल्याने रेल्वे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड रेल्वे स्थानकावरून दररोज ७५ ते ८० प्रवाशी गाड्यांची जा ये सुरू असते. अनेक प्रवासी मनमाड येथे येउन देशाच्या चारही दिशांना प्रवास करत असतात. महत्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची नेहमी गर्दी असते.ही बाब हेरून रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. रेसुब निरीक्षक के. डी. मोरे, उपनिरिक्षक रजनीश यादव ,लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. सोनवणे, कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्थानकावरील सर्व फलाट, बुकींग कार्यालय, पार्सल कार्यालय, पादचारी पुल आदी ठिकाणी डॉगस्कॉडच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली. या बरोबरच रेल्वे स्थानकावर आलेल्या गाड्यांची तपासणी करण्यात आली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून रेल्वे स्थानकावरी कुली, सफाई कामागार, अधिकृत विक्रेते यांची संयुक्त बैठक घेउन त्यांना काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलीसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी स्टेशन प्रबंधक सक्सेना यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
रेल्वेस्थानकावर तपासणी मोहीम
By admin | Updated: March 23, 2017 21:46 IST