शहरभर हाेर्डिंग्जची स्पर्धा अन् वाढले विद्रुपीकरण
नाशिक : शहर व परिसरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शुभेच्छाफलक उभारण्यात येत असल्याने शहर विद्रुपीकरणामध्ये अधिकच भर पडत आहे. शहरभर फलक लावण्याची स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मनपाने ठरवून दिलेल्या जागांव्यतिरिक्त अन्य जागांवरदेखील होर्डिंग्ज लावण्यात आल्याने या होर्डिंग्जबहाद्दरांविरुद्ध कारवाई करणार तरी कोण? असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.
---
वडाळारोडवरील खड्डे बुजविण्याबाबत उदासिनता
नाशिक : वडाळागावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वडाळा चौफुलीपासून तर थेट पांढरी आईदेवी चौकापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची नागरिकांकडून वारंवार मागणी केली जात असतानाही याकडे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. खड्डे बुजविले जात नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळू लागले आहे.
----
शिवजयंतीनिमित्त सजावट साहित्यांना मागणी
नाशिक : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे शहरात सजावट साहित्यांची दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत. भगवे झेंडे, पताका, फोटोंना मागणी वाढत आहे. पंचवटी कारंजा, मेनरोड, उंटवाडी, सीबीएस, भद्रकाली, नाशिकरोड आदि परिसर भगवेमय झाला आहे. विविध संघटना व सामाजिक मंडळांनी भगवे ध्वज लावून परिसर सजविला आहे.
----
बेशिस्त रिक्षाचालकांमुळे अपघातांमध्ये वाढ
नाशिक : शहर व परिसरातील विविध मार्गांवरील रिक्षाचालक बेशिस्तपणे प्रवासी वाहतूक करत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होऊ लागल्याचे चित्र शालिमार ते द्वारका आणि द्वारका ते नाशिकरोड तसेच त्र्यंबकनाका ते सातपूर , वडाळानाका ते वडाळागाव आदी मार्गांवर रिक्षाचालकांची मुजाेरी वाढू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
-----