नाशिक : गो माता की जय!! असे म्हणत शनिवारी (दि.७) शहरात ठिकठिकाणी वसूबारस पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. आश्विन वद्य द्वादशी अर्थात वसूबारस यादिवशी दिवसभर उपवास करून शहरातील पांजरापोळ तसेच विविध गोशाळांमध्ये महिलांनी संध्याकाळी गर्दी करत गाय आणि वासराची पारंपरिक पद्धतीने पूजा करून गायीला नैवेद्य अर्पण केला. दीपावली सणाची सुरुवात वसूबारस या दिवसापासून होत असल्याने शनिवारी रात्री शहर परिसर पणत्या आणि आकाशकंदिलांनी उजळून निघाला होता. आकर्षक आणि नक्षीदार रांगोळ्यांनी दीपावलीचे शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले.शहराची वाढ होत असताना अनेक गोठे नामशेष होऊ लागले त्यामुळे आज शहरातील नागरिकांना पांजरापोळ आणि विविध गोशाळांमध्ये जाऊन गाय आणि वासराची विधिवत पूजा करण्यात आली. पंचवटी परिसरातील पांजरापोळ, तिडके कॉलनी येथील गुरूगंगेश्वर वेदमंदिर आश्रम, तपोवन येथील कृषी गो सेवा ट्रस्ट, दिंडोरी येथील नंदिनी गोशाळा येथे शहरातील नागरिकांसाठी गोवत्स पूजनाची विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. गोवत्स पूजनासाठी आलेल्या भाविकांनी गाय आणि वासराला बाजरी, गूळ, हिरवा चारा यांच्यासह पुरणाची पोळी यांचा नैवेद्य अर्पण केला.गोवत्स द्वादशीनिमित्त विविध गो शाळांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन, बासरीबादन यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश होता. दिवसभर उपवास करून आणि गोवत्स पूजनानंतर बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन भाविकांनी शनिवारी रात्री उशिरा उपवास सोडला. रविवारी (दि. ८)देखील द्वादशी तिथी असून गुरूद्वादशी तिथीमुळे रविवारीही काही ठिकाणी वसूबारस पूजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
गोधनाचे पारंपरिक पूजन उत्साहात
By admin | Updated: November 7, 2015 23:49 IST