पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीला आणखी महिन्याभराचा कालावधी शिल्लक असला तरी महिनाभर अगोदर दाखल साधू-महंत तपोवन साधुग्राममध्ये दाखल झाले आहे. रविवारी शासकीय सुटी असल्याने अनेक नागरिकांनी साधू-महंतांना बघण्यासाठी तपोवन साधुग्राममध्ये धाव घेतल्याने रविवारी साधुग्रामला पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. साधुग्राममध्ये आखाड्यांना जागावाटप झाल्याने काही आखाड्यांनी आपापले तंबू, मंडप उभारणीचे काम सुरू केले आहे, तर काही साधू-महंतांनी उघड्यावरच बस्तान मांडलेले आहे. रविवारचा दिवस सुटीचा असल्याने अनेक कुटुंबीयांनी बाहेर सुटीची मजा लुटण्यासाठी फिरायला जायचे टाळून थेट तपोवन साधुग्राममध्ये धाव घेतल्याने दुपारी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रिकाम्या प्लॉटमध्ये बस्तान मांडलेल्या साधू-महंतांना बघण्यासाठी अक्षरश: नागरिकांनी आपल्या लहान मुलांसमवेत मोठी गर्दी केलेली होती. स्वत:च परिसराची साफसफाई करणारे साधू, तर कोणी स्वत:च स्वयंपाक करणारे, कोणी ध्यानात बसलेले असे विविध प्रकारचे साधू-महंत बघण्याची संधी रविवारच्या सुटीच्या दिवशी नोकरदारांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत साधली. रविवारी तपोवन साधुग्राममध्ये साधू-महंतांना बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने साधुग्रामला पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त झालेले होते. यावेळी अनेक नागरिकांनी कुटुंबीयांसमवेत साधुग्राममध्ये बसलेल्या साधू-महंतांचे चरणस्पर्श करून आशीर्वादही घेतला.
साधुग्राम बनले पर्यटनस्थळ
By admin | Updated: July 12, 2015 23:29 IST