कळवण : तालुक्यातील अनियमित वीजपुरवठा व कालबाह्य झालेल्या वीजवाहिन्या बदलण्यासाठी मंगळवारी दळवट येथे वीज उपकेंद्र आवारात आदिवासी शेतकºयांनी दिलेला ठिय्या व गेल्या बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसने मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे महावितरणची यंत्रणा खडबडून जागी झाली असून, तब्बल चाळीस वर्षांनंतर दळवट परिसरातील कालबाह्य झालेल्या वीजवाहिन्या बदलण्यास सुरुवात करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दळवट भूकंप प्रवण क्षेत्रात वीज वितरण कंपनीकडून होणारा अनियमित वीजपुरवठा व जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या यामुळे वीज कंपनीविरोधात आदिवासी बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या आठवड्यात तालुक्यात दोन आंदोलने करण्यात आली. मागील सप्ताहात दळवट येथे वीजवाहिनी तुटून येथील विश्वनाथ भोये यांच्या शेतातील उभा गहू जळून खाक झाल्याने ५० हजारांचे नुकसान झाले. वीज समस्येबाबत महावितरणचे मुख्य अभियंता कुमठेकर यांच्याशी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी भ्रमनध्वनीद्वारे संपर्क साधून कळवण तालुक्यातील वीज समस्येकडे लक्ष वेधले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसने शासन व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी सलग दोन दिवस दळवट वीज उपकेंद्र व कोल्हापूर फाटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातील पायरीवर ठिय्या आंदोलन केले होते.महावितरणचे मुख्य अभियंता कुमठेकर यांनी दळवट परिसरात भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने तत्काळ उपाययोजना करण्याबाबत व महावितरणच्या यंत्रणेला तालुक्यातील जीर्ण वीजवाहिन्या बदलण्यासाठी विशेष सूचना करून वीज समस्यांचा वस्तुस्थितीनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. सोमवारी नाशिक येथे कळवण तालुक्यातील वीज समस्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. कळवण तालुक्यात ग्रामीण व आदिवासी भागात वीज वितरण कंपनीने विजेचे विणलेले जाळे आता जीर्ण झाले आहे. वीजवाहिन्या अनेक वर्षांपासून असल्याने त्या जीर्ण झाल्या आहेत. परिणामी त्या तुटत असून, शेतकºयांचे नुकसान होत आहे. दळवट व परिसरात सन १९७८ मध्ये वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. दळवट ग्रामपंचायतीने वीज वितरण कंपनीकडे वेळोवेळी निवेदन देऊन जीर्ण झाल्याचे निदर्शनास आणून देत वीजवाहिन्या बदलण्याची मागणी केली होती. वीजपुरवठा जोडणी करण्यासाठी शेतातून तारा ओढलेल्या असल्याने त्या वीजतारा कालबाह्य होऊन त्यांची क्षमता संपली आहे. आदिवासी व ग्रामीण भागात वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळेशेतातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने त्या बदलण्यासाठी वीज वितरण कंपनी पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातील आदिवासी शेतकºयांनी वेळोवळी केली होती. तारा बदलण्यास सुरुवात झाल्याने आता परिसरातील शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दळवट भूकंप प्रवण क्षेत्र : आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश वीजतारा बदलण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:27 IST
कळवण : वीजपुरवठा व कालबाह्य झालेल्या वीजवाहिन्या बदलण्यासाठी दळवट येथे आदिवासी शेतकºयांनी दिलेला ठिय्या व राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळे महावितरणची यंत्रणा खडबडून जागी झाली
दळवट भूकंप प्रवण क्षेत्र : आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश वीजतारा बदलण्यास प्रारंभ
ठळक मुद्देअनियमित वीजपुरवठा व जीर्ण झालेल्या वीजवाहिन्यागहू जळून खाक झाल्याने ५० हजारांचे नुकसान