नाशिक : शहरात श्रीरामनवमी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. रामनवमीनिमित्त मंगळवारी (दि.४) दुपारी १२ वाजता काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. काळाराम मंदिर देवस्थानतर्फे दरवर्षी गुढीपाडव्यापासून वासंतिक नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. कामदा एकादशीला रामरथ आणि गरुडरथाची मिरवणूक काढली जाते. या रथोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवारी पहाटे मंगेशबुवा पुजारी यांच्या हस्ते काकड आरतीने रामजन्मोत्सवाला सुरुवात होणार असून, यावर्षीचे पूजेचे अधिकारी चंदन पूजाधिकारी यांच्या हस्ते मुख्य महान्यास पूजा होणार आहे. यावेळी प्रभू रामचंद्रांना नवीन वस्त्र व पारंपरिक अलंकार चढविण्यात येणार आहेत. दुपारी १२ वाजता पूजाविधी करून जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता शेखरबुवा पुजारी यांच्या हस्ते शेज आरती होईल. एकादशीला म्हणजेच शुक्रवारी (दि.७) श्री रामप्रभू रथयात्रा व भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रामरथ व गरुडरथ ओढण्याचा मान रास्ते आखाडा तालीम संघ व अहल्याबाई व्यायामशाळेकडे असून, श्री काळाराम संस्थानचे सर्व कर्मचारी, पुरोहित व भाविक जन्मोत्सवात सहभागही होणार आहेत. (प्रतिनिधी)
अंबड लिंकरोड परिसरातील महाजननगर येथील महालक्ष्मी मंदिरात साधवी भगवतदास विजयादेवी (इंदोरे) यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमद् भागवत कथा सप्ताह व दुपारी अडीच वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आडगाव नाका परिसरातील कोनार्कनगर येथीस ओंकारेश्वर मंदिरात संध्याकाळी ६.३० वाजता रामजन्मोत्सव उपक्रमांतर्गत काल्याचे कीर्तन व श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.