लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या २५ वर्षांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेना व भाजपात वर्चस्वाची लढाई रंगल्याची चर्चा आहे. विद्यमान सभापती माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी राजीनामा दिल्यामुळे येत्या ७ जुलै रोेजी सभापतिपदाची निवड होणार आहे.देवीदास पिंगळे यांच्या पॅनलमधून निवडून आलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संचालक तुकाराम पेखळे तसेच विश्वास नागरे यांनी काही महिन्यांपूर्वीच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. तसेच राज्य शासनाने रुची कुंभारकर, प्रवीण नागरे, सुनील खोडे या भाजपा नेत्यांची बाजार समितीवर तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. असे असले तरी दुसरीकडे राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले जिल्हा बॅँक संचालक शिवाजी चुंभळे यांनी बाजार समिती सभापतिपदावर आरूढ होण्याचा चंग बांधल्याची चर्चा आहे. त्यातूनच देवीदास पिंगळे यांच्या पॅनलमधून निवडून आलेले सात ते आठ संचालक तसेच भाजपात प्रवेश केलेले दोघे संचालक असे मिळून जवळपास १२ ते १३ संचालक अज्ञातस्थळी सहलीला गेल्याची चर्चा आहे. उद्या मंगळवार, दि.४ जुलै रोजी अविश्वास ठरावासाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष बैठकीसाठी मात्र सर्व संचालकांना बाजार समितीच्या सभागृहात सकाळी पावणे अकरा वाजता उपस्थित राहण्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अमोल हेगडे यांनी दिले आहे. त्यामुळे या सहलीला गेलेल्या संचालकांना नाशिकला यावे लागणार आहे. त्याचवेळी देवीदास पिंगळे यांनी स्वत:हून राजीनामा दिला असल्याने अविश्वास ठरावाची बैठक केवळ औपचारिकता म्हणून उरली आहे. या बैठकीत हा राजीनामा मंजूर करण्याशिवाय संचालकांकडे पर्याय नाही. कारण हा राजीनामा यापूर्वीच जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी मंजूर करून जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांच्याकडे पाठविला आहे. त्यामुळे अविश्वास ठराव बारगळण्यात जमा आहे. आता सभापतिपदावर शिवसेनेने दावा केल्याने भाजपाच्या पदरी निराशा पडण्याची चिन्हे आहेत. त्यातच बाजार समितीचे सभापतिपद हे औट घटकेचे ठरण्याची चिन्हे आहेत. कारण बाजार समितीतील अनियमिततेप्रकरणी संचालकांना बजावलेल्या नोटिसींवर १४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यात बाजार समिती बरखास्त झाली तर सभापतिपद हे औेट घटकेचे ठरण्याची शक्यता आहे.
कृउबा संचालक मंडळाची आज बैठक
By admin | Updated: July 4, 2017 00:22 IST