नाशिक : गेल्या पाच-सहा दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर विसर्ग होऊनही गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० टक्के असल्याने दहा महिन्यांपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठ्यामुळे सुरू असलेली १५ टक्के पाणीकपात मंगळवार, दि. ९ आॅगस्टपासून पूर्णत: रद्द करण्याची घोषणा महापौर अशोक मुर्तडक यांनी केली आहे. दरम्यान, ज्या भागात यापूर्वी दोनवेळ पाणीपुरवठा केला जात होता तो येत्या १५ आॅगस्टपासून पूर्ववत सुरू केला जाणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. महापौरांच्या या घोषणेमुळे नाशिककरांना आता पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे.गेल्या मंगळवारी (दि.२) झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीसह सर्व नद्यांना महापूर आले. त्यानंतर गेल्या चार-पाच दिवसांपासून गोदावरीला पूरस्थिती कायम होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तरीही गंगापूर धरणात आजमितीला ८० टक्के पाणीसाठा आहे. मागील महिन्यात १० जुलैला झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली होती. त्याचवेळी पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर महापौरांनी ११ जुलैपासून दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र, एकवेळ पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून सुरू असलेली १५ टक्के पाणीकपात कायम होती. गेल्या काही दिवसांपासून धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने महापालिकेने संपूर्ण पाणीकपात रद्द करून दोनवेळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी होऊ लागली होती. गेल्यावर्षी गंगापूर धरणातील पाणीसाठा ७०.७१ टक्के असताना जायकवाडीसाठी १.३६ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासून एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला होता. त्यानंतर महापौरांनी ३० नोव्हेंबर २०१५ रोजी विशेष महासभा बोलवत एकवेळ पाणीपुरवठ्याबरोबरच आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचे आदेश दिले. मध्यंतरी डिसेंबरमध्ये प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून पाणीकपात वाढविण्याचा प्रयोगही करून पाहिला, परंतु तो लोकप्रतिनिधींनी हाणून पाडला. पुढे २२ फेब्रुवारी २०१६ पासून विभागवार पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले, मात्र त्यातही अडचणी उद्भवल्याने महापालिकेने १० मार्च २०१६ पासून आठवड्यातून दर गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याची अंमलबजावणी सुरू केली. त्यानंतर मागील महिन्यात १० जुलैला जोरदार वृष्टी होऊन धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने आशा पल्लवित झालेल्या महापौरांनी ११ जुलैपासून दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द केली.
आजपासून पाणीकपात पूर्णत: रद्द
By admin | Updated: August 9, 2016 01:05 IST