त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिरसगाव (त्र्यंबक), काचुर्ली व रायते येथील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी त्र्यंबक तहसीलने सुमारे ६५० कर्मचाऱ्यांची फौज सज्ज केली आहे. रविवारी (दि. १७) या ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.प्रशासनाने विधानसभा-लोकसभेच्या निवडणुकीसारखी तयारी केली आहे. विशेष म्हणजे सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांची नंबर देऊन नियुक्ती करण्यात आली. पण त्यांची कोणत्या गावी नियुक्ती केली ते गोपनीय ठेवण्यात आले होते. मात्र आज मोहिमेवर जाण्याआधी गावांची नावे जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत एकूण १२१ मतदान केंद्रे असून, ४४२ जागांसाठी २५२ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. ३२,०८५ पुरुष, तर २९,२१३ स्त्री मतदार आहेत. एकूण ६१२९८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १८६ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. आज सर्व निवडणूक कर्मचारी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले. एका बूथवर ५ असे १२१ बूथ तयार करण्यात आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ५५ वाहने अधिग्रहीत केली असून, त्यात ४ एसटी महामंडळाच्या बसेस आहेत. ही सर्व वाहने जव्हार फाट्यावर उभी करून ठेवण्यात आली होती. सर्व कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी या वाहनांतून रवाना झाले. तहसीलदार नरेशकुमार बहिरम या यंत्रणेचे प्रमुख असून, निवासी नायब तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी सर्व काम पाहात आहेत. निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे, त्यांचे सहायक देशमुख, इतर कारकून यंत्रणा सांभाळत आहेत. आज तहसील कार्यालयात तुडुंब गर्दी झाली होती. वाहने पार्किंगसाठी जागा अपुरी पडत होती. (वार्ताहर)
त्र्यंबकेश्वर,पेठला आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 00:10 IST