नाशिक : कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजास आरक्षण आणि अॅट्रॉसिटीचा होणारा गैरवापर थांबवा या प्रमुख मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या एकजुटीची वज्रमूठ शनिवारी (दि. २४) नाशिकला आवळली जाईल आणि लाखोंच्या संख्येने एकत्र येणाऱ्या मराठा समाजाच्या मूक मोर्चातून अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज उठविला जाईल. औरंगाबादपासून सुरू झालेली ही लोकचळवळ नाशिकच्या वेशीवर येऊन धडकणार असून, मराठा क्रांतीच्या मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहर भगवेमय झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे १३ जुलै रोजी झालेल्या बलात्कार आणि खुनाच्या घटनेनंतर सर्वत्र निषेधाचे सूर उमटत आहेत. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने ९ आॅगस्टपासून राज्यभर मूकमोर्चे काढले जात आहेत. विविध शहरांमध्ये शिस्त, संयम आणि उत्तम नियोजनाचा आदर्श घालून देणाऱ्या विराट मोर्चांनी सर्वत्र मराठा समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडविले आहे. सकल मराठा समाजाच्या नियोजनानुसार, शनिवारी (दि. २४) नाशिकला सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा जाऊन धडकणार आहे. गेल्या महिनाभरापासून मूकमोर्चाची तयारी सुरू होती. ठिकठिकाणी, गावोगावी मराठा समाजाने एकत्र येऊन मूक मोर्चात सहभागी होण्याच्या दृष्टीने समाजबांधवांना आवाहन केले. ‘सोबत याल तर सुखरूप राहू’ असे सांगत गावोगावी मराठा समाज एकवटला गेला. तपोवन ते गोल्फ क्लब या दरम्यान निघणाऱ्या मूक मोर्चासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आले असून रस्त्यांलगत विविध सेवांसाठी मंडप उभारणीचेही काम पूर्ण झाले आहे. तपोवनातून मोर्चाला आरंभ होणार असल्याने परिसराच्या साफ-सफाईवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गोल्फ क्लब येथे मोर्चाची सांगता होणार असल्याने त्याठिकाणी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मोर्चाच्या निमित्ताने शहरात लाखोंचा जनसमुदाय एकत्र येणार असल्याने पोलिसांनीही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मोर्चाच्या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असून माध्यमिक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे, तर काही शाळांना सुट्या देण्यासंबंधी त्या-त्या मुख्याध्यापकांना अधिकार देण्यात आला आहे. दरम्यान, मोर्चासाठी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष-संघटनांचे नेते, पदाधिकारी यांनी नाशिकला तळ ठोकला आहे. सुमारे १५ ते २० लाख समाजबांधव मोर्चात सहभागी होण्याचा अंदाज संयोजकांकडून व्यक्त केला जात आहे. मोर्चातील क्रमवारीमूकमोर्चात सर्वात अग्रभागी महाविद्यालयीन विद्यार्थिनी, तरुणींचा सहभाग असणार आहे. त्यापाठोपाठ महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक व बुद्धिजीवी वर्ग, पुरुष आणि सर्वात शेवटी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी असा क्रम राहणार आहे. मोर्चामार्गावर १० हजार स्वयंसेवक तैनात राहणार असून, ७० वैद्यकीय पथकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ५० रुग्णवाहिका तयार ठेवण्यात येणार आहेत. जनसागर उसळण्याचा अंदाजशनिवारी होणाऱ्या मूक मोर्चाच्या तयारीची माहिती बैठका, रॅली, भित्तीपत्रके, बॅनर्स, होर्डिंग्ज या माध्यमातून गावोगावी पोहोचविण्यात आली. मोर्चाच्या तयारीसाठी सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला जात आहे. मोर्चासाठी काउंटडाउन सुरू झाले असतानाच नियोजनाला वेग आला असून जिल्हाभरातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता नाशिकला लाखोंचा जनसागर उसळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आज नाशकात एकजुटीची वज्रमूठ
By admin | Updated: September 24, 2016 01:42 IST