नाशिक : रामनवमीनिमित्ताने रविवारी शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राममंदिरांमध्ये रामजन्मोत्सव, मिरवणूक, कीर्तन, प्रवचन यांची रेलचेल पहायला मिळणार आहे. नाशिकचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री काळाराम मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र शुद्ध नवमी हा चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस असून, या तिथीस भगवान रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. या दिवशी शहरातील विविध मंदिरांमध्ये रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या मूर्तीस फुलांच्या हारांसमवेतच साखरेचे हारही अर्पण केले जातात. रविवारी शहरातील मंदिरांमध्ये भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. काही ठिकाणी तर हरिनाम सप्ताह, व्याख्यानमाला, गीतरामायणाच्या गायनाने समारोप होणार आहे. विनयनगर येथील श्रीराम मंदिरात ‘सूर तेच छेडिता’ ही स्वरमैफल, सिडकोतील साहेबा युवा फाउंडेशन व टेंभीनाका मित्रमंडळातर्फे श्रीरामाच्या १२ फूट उंच मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. जेलरोडच्या बिर्ला मंदिरातही जन्मोत्सवाबरोबर गीतरामायण संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.उपनगरच्या इच्छामणी मंदिरात विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांचे प्रवचन होणार आहे. याशिवाय आगरटाकळी, इंदिरानगर, सातपूर, मेरी, पंचवटी आदी विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. देवळाली गावात सायंकाळी श्रीराम मूर्तीची मोठी शोभायात्रा निघणार आहे.काळाराम मंदिरात विविध कार्यक्रमश्री काळाराम मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकडा आरती व त्यानंतर सकाळी ७ वाजता यंदाचे उत्सवाचे मानकरी पुष्कराजबुवा पूजाधिकारी यांच्या हस्ते श्रींची विधीवत पूजा करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता महाआरती होईल. दुपारी १२ वाजता मुख्य मंदिरात उत्सवाचे मानकरी, पुजारी, विश्वस्त यांच्या उपस्थितीत रामजन्म साजरा केला जाणार आहे. यावेळी मंत्रोच्चारात पुजारी पौरोहित्य करतील. राममंदिराच्या आवारात महिला भगिनी फुलांनी सजविलेल्या पाळण्यात रामा ची प्रतिमा ठेवून रामजन्मा निमित्ताने भजन गीत, सादर करतील. सायंकाळी देवाला विविध ५६ प्रकारच्या पदार्थांपासून तयार केलेला अन्नकुटाचा नैवेद्य दाखविला जाईल. त्यानंतर मंदिर परिसरात दिवसभर भजनी मंडळांचा भजनगीताचा कार्यक्रम होणार आहे. रामनव मीनिमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने देवदर्शनाला येणाºया भाविकांना पूर्व दरवाजाने आत सोडून दक्षिण व उत्तर दरवाजाने बाहेर निघण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सध्या उन्हाचे दिवस असल्याने भावि कांना उन्हापासून बचाव करता यावा यासाठी शामियाना उभारणी करून मंदिरातील काही दगडांवर पांढºया रंगाचे पट्टे मारण्यात आले आहेत. संस्थानच्या वतीने भाविकांना प्रसाद वाटप तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे संस्थानचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश देशमुख, विश्वस्त पांडुरंग बोडके, मंदार जानोरकर यांनी सांगितले. रविवारी रामनवमीनिमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण काळाराम मंदिर व परिसरात पोलीस बळ तैनात केले जाणार आहे.
आज रामजन्मोत्सव : शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 01:00 IST