सिडको : परिसरातील एका मोठ्या फळ व्यावसायिकाला पिस्तूलने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न क रत पाच लाख रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी टिप्परचा म्होरक्या गणेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्यासह चार संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.शुक्रवारी (दि. ३१) सिडको भागात राहणाऱ्या एका फळ व्यावसायिकाला गण्या कावळ्या याने शाकीर नासीर पठाण ऊर्फ मोठा पठाण व अन्य संशयितांनी पिस्तूलने व्यावसायिकाला ठार मारण्याचा प्रयत्न करत पाच लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी मोठा पठाण व गण्या कावळ्यावर खंडणी वसुली व जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शोध पथकाने तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पंचवटी भागात गुन्हे शोध पथकाने सापळा रचला. दरम्यान, मोरे मळ्यातून गण्या कावळ्याला पोलिसांनी अटक केली. तसेच या प्रकरणातील अन्य संशयित किरण पेलमहाले (सिडको), देवदत्त घाटोळे (डीजीपीनगर-२), मुकेश राजपूत (पवननगर) यांसह एक अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. या कारवाईमध्ये गुन्हे शोध शाखेचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, रवींद्र सहारे आदिंनी सहभाग घेतला. (वार्ताहर)
टिप्पर गॅँगच्या गण्या कावळ्याला अटक
By admin | Updated: June 2, 2016 00:12 IST