नाशिक : शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना बसचा पास काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी पाहता परिवहन महामंडळाने शाळा-महाविद्यालयांत पास केंद्र सुरू करण्यासाठी केलेल्या आवाहनाला अनेक महाविद्यालयांनी प्रतिसाद दिला असून, विद्यार्थ्यांना त्यामुळे तेथेच पास उपलब्ध होत आहेत, तर ज्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी पास वितरित करणाऱ्या केंद्राच्या वेळेत आजपासून वाढ करण्यात आली आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पास काढण्यासाठी पास केंद्रावर तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त हा वेळ घालविताना त्यांंचे शैक्षणिक नुकसान होत असते. सार्वजनिक सुटीच्या दिवशी पास केंद्रालाही सुटी असल्याने विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी कामकाजाच्या दिवशीच यावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांची ही धावपळ टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने केटीएचएम, एमईटी, के. के. वाघ यांसारख्या अनेक महाविद्यालयांत ही सुविधा उपलब्ध करून दिली. तत्कालीन विभाग नियंत्रक कैलास देशमुख यांनी केलेल्या आवाहनानुसार त्या महाविद्यालयांनी परिवहन महामंडळाशी संपर्क साधून ही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याने त्यांची धावपळ थांबली आहे. (प्रतिनिधी)
बस पाससाठी वाढविली कार्यालयांची वेळ
By admin | Updated: July 15, 2014 01:13 IST