नाशिक : हॉटेलच्या बांधकामात करण्यात आलेल्या उत्खननात अनुमतीपेक्षा जादा गौणखनिज काढण्यात आल्याने जवळपास दहा कोटी रुपये दंड वसूल करण्यासाठी बाह्या सरसावलेल्या जिल्हा प्रशासनाने अवघ्या अठ्ठावीस लाख रुपयांची वसुली करून हॉटेलमालकापुढे मान तुकविण्याची बाब संशयास्पद ठरली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेची जोरदार चर्चा होत असून, हॉटेलमालकाला दिलेल्या अभयामागचा ‘अर्थ’ शोधला जात आहे. मोठा गाजावाजा करून महिनाभरापूर्वी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातलेल्या या प्रकरणाचा समारोप अगदीच गुपचूप करण्यात आला असला तरी, गौणखनिजाचे उत्खनन व त्यामागे चालणारे राजकारणही यानिमित्ताने समोर आले आहे. पाथर्डी शिवारात काम सुरू असलेल्या एका हॉटेलमालकाने नाशिक तहसील कार्यालयाकडून सात ब्रास उत्खननाची अनुमतीसाठी अर्ज सादर केला व त्यासाठी रॉयल्टीची रक्कमही भरली होती. परंतु हॉटेलचे काम असल्याने घेतलेल्या अनुमतीपेक्षा अधिकचे उत्खनन हॉटेल मालकाने केल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या कानी लागल्याने त्यांनी अपर जिल्हाधिकारी व नाशिक प्रांत अधिकाऱ्यांना या संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते.
दहा कोटींचा मामला, अठ्ठावीस लाखांत मिटला !
By admin | Updated: April 5, 2017 00:36 IST