नाशिक : शहराच्या मध्यवस्तीत महापालिकेच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात गावठी बॉम्बचे पार्सल पाठवण्याचा धक्कादायक प्रकार व्यवस्थापकाच्या चाणाक्षपणामुळे उघड झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करून हा बॉम्ब निकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली़ यामागे व्यावसायिक वाद वा व्यावसायिकास धमकावण्यासाठी हा प्रकार केल्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ या घटनेमुळे शहराच्या सुरक्षीतेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलीसांसमोर मोठे कडवे आव्हान उभे ठाकले आहे.नाशिक शहर हे अगोदरच अतिरेक्यांच्या हिटलीस्टवर आहे. त्यातच ही घटना मंगळवारी घडली.गजबजलेल्या शरणपूर रस्त्यावरील राजीव गांधी भवनसमोरील सुयोजित हाईट्स इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अनंत राजेगावकर या बांधकाम व्यावसायिकाचे मुख्य कार्यालय आहे़ तसेच आजूबाजूला बँका, मेडिकल दुकाने, डॉक्टरांचे क्लिनिक, जनरल स्टोअर्स अशी व्यापारी दुकाने आहेत़ बुधवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास तोंडाला रूमाल व डोळ्यावर गॉगल लावलेला एक अनोळखी व्यक्ती खाकी रंगाच्या पुठ्ठ्याच्या खोक्यामध्ये गावठी बॉम्ब पॅक करून राजेगावकर यांच्या कार्यालयात घेऊन गेला़ तेथील सर्व कर्मचारी हे भोजन करीत असल्यामुळे कार्यालयाच्या रिसेप्शन काउंटरवर पार्सल ठेवून ही व्यक्ती घाईने तेथून पसार झाली़यानंतर या कार्यालयात एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून हे पार्सल अनंत राजेगावकर यांनाच देण्यास दूरध्वनी उचलणाऱ्या शिपायास बजावले.तथापि, राजेगावकर हे कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे शिपाई राज ताठे याने स्वत:च पार्सलमधील बॉक्स खोलण्यास सुरुवात करत असताना प्रशासकीय अधिकारी माजी सैनिक असलेल्या अशोक चौधरी यांना बॉक्समध्ये बॉम्ब असल्याचा संशय आला़ त्यांनी तत्काळ शिपायाच्या सहाय्याने हा बॉक्स कार्यालयाखालील मोकळ्या जागेत ठेवून पोलिसांना माहिती दिली़ पोलिसांनी तत्काळ श्वान पथकास पाचारण करून या बॉक्सची पाहणी केली़ यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने काळजी घेऊन परिश्रम पूर्वक गावठी बॉम्ब निकामी केला़ आणि साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.प्रारंभी पोलिसांचे मॉकड्रील सुरू असल्याची अफवा होती़ मात्र पोलिसांचा मोठ्या संख्येने पोहोचलेला ताफा व खरोखरच हा बॉम्ब असल्याचे कळल्यानंतर बध्यांची गर्दीही वाढली होती़ दरम्यान, बॉम्बशोधक व नाशक पथकाने खोक्यातील बॉम्ब निकामी करण्यापूर्वी पोलिसांनी गर्दी हटवून दुकानाचे शटरही बंद करण्याची सूचना दिली होती़ तब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर बॉम्ब निकामी करण्यात यश आले़ त्यानंतर पोलिसांनी केलेल्या पाहणीत सदरचा बॉम्ब हा गावठी स्वरूपाचा असल्याचे आढळून आले. बॅटरी, टायमर, सर्किट व त्याला पेट्रोलची बाटली, आगपेटीच्या काड्या, बल्ब हे लावून हा बॉम्ब तयार करण्यात आला होता़ हा गावठी बॉम्ब शक्तिशाली नसला तरी, तो नुकसानकारक व हाताळणाऱ्या व्यक्तीसाठी प्राणघातक ठरण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली़ दरम्यान, हा प्रकार व्यावसायिक वादातून वा राजेगावकर यांना धमकावण्यासाठी करण्यात आला का याची पोलीस चौकशी करीत आहेत़ अशोक डी़ चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)
थरार : निकामी केल्याने दुर्घटना टळली, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
By admin | Updated: February 25, 2015 23:17 IST