तिघांची सुखरूप सुटकाकुंदेवाडीतील थरार : १२ तासांचे शर्थीचे प्रयत्ननिफाड : पालखेड धरणातून कादवा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे आलेल्या पुरात मंगळवारी कुंदेवाडी येथील तीन अडकले होते. त्यांची एनडीआरएफ (नॅशनल डिझॉस्टर रेस्क्यू फोर्स) आणि आर्मीच्या मदतीने १२ तासांनंतर रात्री २ वाजेदरम्यान सुखरूप सुटका करण्यात आली.कुंदेवाडी येथील कादवा पात्रात मंगळवारी दुपारी ४ वाजता केदू पवार, मांगीलाल माळी, पिंटू सूर्यवंशी हे तिघे जण पुराच्या पाण्याच्या वेढ्यात अडकले होते. या तिघांनी कादवा पात्रात एका मातीच्या भरावावर आधार घेतला होता. पुराच्या पाण्याचा लोंढा प्रचंड असल्याने पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाठवणेही धोक्याचे होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांनी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी संपर्क साधून त्या तिघांची सुटका करण्यासाठी आर्मीच्या पथकाची मदतीची मागणी केली. रात्री ९.३० च्या दरम्यान २० आर्मीचे जवान आणि एनडीआरएफचे पथक पिंप्री गावाच्या बाजूने कादवा किनारी पोहोचले व त्यांनी त्या तिघांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एका बोटीतून आर्मी व जवान त्यांना रात्री नदीतील मार्ग समजावून सांगण्यासाठी पिंप्री येथील चौघे तरुण असे नऊ जण प्रखर दिव्याच्या झोतात अडकलेल्या तरुणांपर्यंत पोहोचले व रात्री २ वाजता या तिघांना नदीकिनारी आणले आणि प्रशासनाने सुटकेचा सुस्कारा सोडला.पिंपळगाव पोलीस, अग्निशामक दल, स्थानिक कुंदेवाडी, पिंप्री येथील नागरिक या सर्वांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. निफाडचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळ, जिल्हा प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन पथकाचे गायकवाड, तहसीलदार विनोद भामरे, निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, नायब तहसीलदार शांताराम पवार, निरगुडे, सर्कल बागडे, तलाठी महेश गायकवाड यांच्यासह अधिकारी, नागरिक, कुंदेवाडीचे उपसरपंच वैकुंठ पाटील, ग्रामपंचायत सदस्य अभय बलदोटा आदि या तिघांना बाहेर काढण्याकामी सर्व स्तरावर प्रयत्न करीत होते.(वार्ताहर)
तिघांची सुखरूप सुटका
By admin | Updated: July 13, 2016 22:44 IST