नाशिक : दिवसेंदिवस घटत चाललेल्या पर्जन्यमानाचा परिणाम आता दिसून येत आहे. विहिरी आटल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. शेतीसाठी गेल्या वर्षी घेतलेले कर्ज यंदाही फिटले नाही अशी ओरड गेल्या अनेक वर्षांपासून करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाचा भार आता सोसवेनासा झाला आहे. व्याजामुळे हैराण झालेला शेतकरी आत्महत्त्या करीत आहे. दिवसेंदिवस ही संख्या आता वाढू लागली आहे. पूर्वी वर्षातून एखादी आत्महत्त्या होत असे. आता हा प्रकार सर्रास होऊ लागला आहे. दिवसेंदिवस कर्जामुळे आत्महत्त्या होणे ही बाब अधिक गंभीर होत चालली आहे. द्याने : राहुड, ता. बागलाण येथील तरुण शेतकरी श्यामकांत देवराम ठाकरे (२८) यांनी दुष्काळी परिस्थिती व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. सामाजिक कार्यकर्ते अशोक ठाकरे यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात खबर दिली.सततची नापिकी बदलते हवामान मजूर टंचाईशिवाय दुष्काळी परिस्थिती शेतीवर होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने श्यामकांतच्या बऱ्याच दिवसांपासून चिंताक्रांत होता. शेतातील पोल्ट्रीसाठी उचललेले बँकेचे कर्ज, घेतलेले ट्रॅक्टरचे कर्ज कसे फेडणार त्याशिवाय उचल केलेली हातउसनवार या विवंचनेत त्याने नामपूर-साक्री रस्त्यावरील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केली. तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासनाकडून योग्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले. परिसरातील शेतकऱ्यांनी खचून न जाता परिस्थितीचा सामना करावा, असे नमूद केले. नामपूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन केले. (वार्ताहर)डांगसौंदाणे : बुंधाटे (ता.बागलाण) येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बुंधाटे (ता. बागलाण) येथील शेतकरी रामदास काशीराम देवरे (४८) यांनी सोमवारी दुपारी १२ ते १२.३० दरम्यान आपल्या शेतातील घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सदर घटना उशिरा लक्षात आली. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून देवरे यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र त्या पूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली होती. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक पी.टी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. बी. घायवट, भोये, आर.के. बागुल हे करीत आहेत. ५ ते ६ महिन्यांपूर्वीच देवरे यांच्या मुलीचे लग्न झाले असून, लग्नासाठी काढलेल्या कर्जाचा बोजा त्याच्यावर होता व कांदा लागवडीसाठी टाकलेले बियाणे वाया गेल्याने ते चिंताग्रस्त होते. (वार्ताहर)कळवण : सहकारी संस्था, फायनान्स व हात उसणवार घेतलेल्या कर्जाच्या वाढत्या भारामुळे कळवण येथील शेतकरी दीपक मोतीराम निकम (४१) यांनी गुरुवारी (दि. १९) राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्त्या केली. कळवण येथील शेतकरी दीपक मोतीराम निकम यांनी कळवण बु।। विविध कार्यकारी सोसायटीकडून व शहरातील पतसंस्थांकडून कर्ज घेतले होते. दरवर्षी फक्त उलटपालट केली जात होती. त्यामुळे कर्जाच्या वाढत्या भारामुळे आर्थिक तणावात होते. त्याच्याकडे दीड एकर शेतजमीन असून, शेतीसाठी सोसायटीकडून कर्ज घेतले होते. गेल्या काही दिवसापासून दीपक निकम आर्थिक व मानिसक तणावाखाली वावरत असल्याचे ग्रामस्थ व नातेवाईक यांनी सांगितले. गुरु वारी रात्री इंजेक्शन्सद्वारे विष घेवून आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर निदर्शनास आली ,कळवण उपजिल्हा रु ग्णालयात शवविच्छेदन करून त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)
जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या
By admin | Updated: November 24, 2015 21:45 IST