सिन्नर : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या माळेगाव येथील एका कंपनी कामगाराचा जोगलटेंभी येथे, तर मुसळगाव येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा देवनदीवरील कुंदेवाडी येथील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याचा घटना रविवारी घडली. या दोन ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे गणेश विसर्जन मिरवणुकींवर दु:खाचे सावट दिसून आले. मुसळगावच्या शंकरनगर येथील गणेश मंडळाचे कार्यकर्ते शनिवारी श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी देवनदीवरील कुंदेवाडी येथील आंब्याच्या बंधाऱ्यात गेले होते. मूर्ती विसर्जन केल्यानंतर सर्व मंडळाचे कार्यकर्ते घरी परतले. मात्र संजय नारायण तारू (१६) हा युवक घरी आला नव्हता. सकाळी ७ वाजता संजयचा मृतदेह बंधाऱ्यावर तरंगळत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अन्य एका दुसऱ्या घटनेत जोगलटेंभी येथे कंंपनी कामगाराचा गोदा-दारणा संगमावर गणेश विसर्जनावेळी बुडून मृत्यू झाला. माळेगाव येथील टॅम इंजिनिअरिंग कारखान्यातील कामगार कंपनीच्या गणेश विसर्जनासाठी जोंगलटेंभी येथील संगमावर गेले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास कामगार संगमावरील पाण्यात उतरले.कृष्णा भिकारीलाल दुर्वे (२३) या कामगाराला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो त्यात बुडाला. नागरिकांनी त्याला बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दुर्वे हा मूळ बैतूल (मध्य प्रदेश) येथील आहे.नोकरीसाठी तो माळेगाव येथे आला होता. दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
विसजर्नासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू
By admin | Updated: September 28, 2015 23:44 IST