मालेगाव : येथील पोलीस कवायत मैदानावर तरुणाला मारहाण, दमदाटी करुन त्याच्याकडून १२ हजार रुपयांची रोकड व भ्रमणध्वनी असा मुद्देमाल लुटून नेणाºया तिघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलीसांनी दुचाकीसह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या ७ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास विना क्रमांकाच्या दुचाकीवर पोलीस कवायत मैदानावर येऊन अबरार अन्सारी सकरुल्ला अन्सारी (३६) रा. बादशाह खान नगर याला बेदम मारहाण करुन त्याच्याकडुन १२ हजार रुपयांची रोकड, भ्रमणध्वनी चोरुन नेला होता. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहु व पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या प्रकरणातील संशयीत आरोपी आशिष रमेश पगारे (२०) रा. सानेगुरूजी नगर, संदीप मुकुंद महाले (२१) आकाश कैलास जवराज (२२) दोघे रा. गायकवाड चौक यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मालेगावी तरुणाला लुटणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 17:41 IST