पिंपळगाव बसवंत : आर्थिक विवंचनेतील आदिवासीं बांधवांना आधार देणारी खावटी योजना शासनाने सुरू केली आणि त्यात आदिवासी बांधवांना लाभ मिळाला. निफाड तालुक्यात अकरा हजार लाभार्थी खावटी योजनेस पात्र ठरले, मात्र कागदपत्रांची पूर्तता करून देखील तांत्रिक अडचणीमुळे हजारो बांधवांना खावटी अनुदानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे त्या बांधवांना देखील खावटी अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी तालुक्यातील मुखेड गावचे सरपंच अमोल जाधव यांनी आदिवासी विकास आयुक्त नाशिक यांना ऑनलाईन अर्ज करून खावटीपासून वंचित असलेल्या बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. कोरोनामुळे आदिवासी कुटुंबांना रोजगार नसल्याने आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याने शासनाने खावटी योजनेतून आदिवासी बांधवांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या योजनेत एकूण चार हजार रुपये कुटुंब अनुदान देण्यात आले .ज्यामध्ये दोन हजार रुपये किमतीच्या वस्तू आणि दोन हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आली. त्यात खावटी अनुदान योजनेत एका कुटुंबास मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीदडाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती असा दोन हजार रुपयेपर्यंतचा किराणा देण्यात आला .
-------------------
तांत्रिक अडचण
या योजनेसाठी निफाड तालुक्यातील आदिवासी बांधवांनी अर्ज केला होता, मात्र त्यातील फक्त ११ हजार बांधवांना त्याचा लाभ मिळाला. उर्वरित हजारो बांधव खावटीच्या योजनेपासून वंचित आहे. याबाबत सरपंच अमोल जाधव यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता तांत्रिक अडचण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खावटीपासून वंचित असलेल्या हजारो बांधवांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
.........................................................
मुखेड गावात १५० कुटुंब आदिवासी बांधवांचे आहे आणि त्यातील फक्त ५४ बांधवांनाच त्याचा लाभ मिळाला. उर्वरित ९६ बांधवांना त्या योजनेपासून वंचित राहावे लागले. मग निफाड तालुक्यात तर हजारो बांधव वंचित असतील. त्यामुळे फॉर्म भरूनही खावटीपासून वंचित असलेल्या बांधवांची दखल घेऊन त्यांना खावटी योजनेचा लाभ शासनाने द्यावा.
- अमोल जाधव, सरपंच, मुखेड