पंचवटी : जात नाही ती जात, असे समाजातील जातीव्यवस्थेचे उदाहरण सांगितले असले तरी नाशिक शहरात मात्र सुमारे सव्वाशे नागरिकांनी जात सोडण्याची शपथ घेऊन जातीअंत चळवळीला प्रोत्साहन दिले आहे. हातात गोदावरीचे पवित्र जल घेऊन तसेच गोदामाईच्या साक्षीने, मी जाती जातीत भेदाभेद करणार नाही, यापुढे मी जात पात पाळणार नाही आणि आजपासून मी माझ्या जातीचा कुठेही उल्लेख करणार नाही, या क्षणी मी माझ्या जातीचे या पवित्र जलामध्ये विसर्जन करत आहे. यापुढे माझी ओळख फक्त हिंदू म्हणूनच राहील असे म्हणून गोदावरीच्या तीरावर शेकडो नागरिकांनी ‘मी स्वहिंदू’ म्हणत आपली जात सोडण्याचा संकल्प केला.स्वहिंदू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित केलेल्या धर्माेद्धार या कार्यक्रमांतर्गत सोमवारी सकाळी यशवंतराव महाराज पटांगणावर जाती व्यवस्था निर्मूलन संकल्प आणि जात सोडण्याचा शपथविधी पार पडला. यावेळी १२० जणांनी एकत्र येऊन गोदाजल हातात घेत सूर्यदेवतेला साक्षी ठेवून ‘मी स्वहिंदू, मी स्वहिंदू’ अशी शपथ घेतली. हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेली जातीव्यवस्था कालबाह्य होऊन अनेक वर्षे झाली; परंतु अजूनही आपण न कळत ती पुढे नेत आहोत. जाती निर्मूलनाचे नारे लावले जात आहे, पण त्यावर कृती करणे गरजेचे असून प्रत्येकाची ही जबाबदारी आहे, असे उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व गणेशपूजन झाले पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांनी पौरोहित्य केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, हिंदू एकता पक्षाचे रामसिंग बावरी, मधुकर भालेराव आदिंसह स्वहिंदू ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सुनील सोनवणे, तात्याभाऊ नेरे, रामनाथ काळे, गणेश कांगणे, संजय बैरागी, अनिता सोनवणे, सारंग सोनवणे, पंकज कापडणीस, सुरभी सोनवणे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. टी. इंगळे यांनी केले. (वार्ताहर)
सव्वाशे जणांनी सोडली जात
By admin | Updated: March 8, 2016 00:27 IST