सायखेडा : मार्च महिन्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीत पाणी कमी झाले होते. नदीला पाणी सोडावी अशी मागणी जोर धरू लागली असतांनाच प्रशासनाने काही दिवसांपुर्वी गंगापुर धरणातुन गोदावरीला पाणी सोडले, मात्र सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी दुथडी भरून वहात असली तरी नदी पात्रातील दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन गोदावरीला पाणवेलींचा विळखा पडत असल्याने, सुस्तावलेले प्रशासन मात्र कोणतेही हालचाल करत नसल्याने गोदाकाठ भागातील नागरिकांना पाणी असुनही नहाक त्रास सहन करावा लागत आहे. कोरडी पडलेली गोदावरी गंगापुर धरणाच्या आवर्तनाने खळाळली, त्यामुळे गोदाकाठ भागातील पाणी टंचाईचे गडद होत चाललेले संकट तुर्तास टळले आहे. तर नाशिक ते नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यापर्यंत पाणवेलींच्या विळख्यात अडकलेली गोदावरी काही प्रमाणात साफ होत, पुन्हा नाशिक भागातुन पाण्याबरोबर वहात आलेल्या पाणवेली गोदाकाठ भागात पसरल्याने गोदावरीवर पुन्हा गडप झाली आहे. गोदावरी उगमस्थानापासुनच समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. त्यात नाशिक महानगर पालिका हद्दीतील, औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने, गोदाकाठ भागातील ग्रामस्थांना दुषित पाणी प्यावे लागते. ओढा येथे गोदातिरावर असलेल्या डैमवर अनेक दिवसांपासुन पाणी साचुन होते, हे पाणी आवर्तन आल्याने गोदाकाठ भागात वाहून येत, या भागात पाण्याला दुर्गंधी येत आहे. तर आवर्तन सोडले जाते तेव्हा पाणी पुढे जावे, यासाठी गोदाकाठ भागातील विज पुरवठा खंडित केला जात असल्याने, नेहमीच पाणी असलेल्या गोदाकाठ भागातील शेतकरी, ग्रामस्थांना पाणी असुनही नहाक त्रास सहन करावा लागतो.
गोदावरीतील दुषित पाण्याने हजारो मासे मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:44 IST