ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 15 - ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळपट्टी रोमांच निर्माण करीत आहे. रांचीत देखील आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या तिस-या कसोटीपूर्वी उभय संघांच्या आकर्षणाचे केंद्र खेळपट्टीच आहे. बंगळुरू येथे दुसºया कसोटीदरम्यान उद्भवलेल्या डीआरएस वादाचा सौहार्दपूर्ण शेवट झाला. चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेत १-१ ने बरोबरीत असलेले उभय संघ रांचीच्या जेसीए स्टेडियममधील खेळपट्टीवर नजरा रोखून आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मैदानावर हा पहिलाच कसोटी सामना असेल.
पुण्यातील पहिल्या कसोटीसाठी असलेली खेळपट्टी खराब तर बंगळुरूमधील दुस-या कसोटीची खेळपट्टी देखील साधारण असल्याचा निष्कर्ष मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी काढला होता. बेंगळुरूत भारताने माघारल्यानंतरही मुसंडी मारून विजय साकार केल्याने आत्मविश्वास उंचावला. दुस-या कसोटीत प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव्ह स्मिथ पायचित झाल्याने रिव्ह्यू मागण्याआधी त्याने ड्रेसिंग रुमकडे पाहिले. यावर बराच वाद गाजला. तिसºया सामन्याच्या निमित्ताने दोन्ही संघांच्या चिंतेचा विषय खेळपट्टी आहे. ही खळपट्टी फिरकीला अनुकूल मानली जात आहे. पण स्थानिक अधिका-यांनी मात्र पाच दिवस एकसारखेच स्वरूप राहील, असे भाकीत केले. आठवडाभराआधी येथे पाऊस आला.
आज सकाळी खेळपट्टीवर पाणी टाकण्यात आले. त्यामुळे खेळपट्टीवर टणकपणा नसेल. या मालिकेत आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाने शतक ठोकलेले नाही. तीन अर्धशतके ठोकणारा लोकेश राहुल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विराटने चार डावांत केवळ ४० धावा केल्या. बंगळुरुत पुजारा-रहाणे यांनी पाचव्या गड्यासाठी ११८ धावा करीत सामना खेचून आणला होता. मालिकेतील ही एकमेव शतकी भागीदारी आहे. खांदेदुखीतून सावरलेला सलामीचा मुरली विजय तिसºया सामन्यात अभिनव मुकुंदचे स्थान घेईल. दुसरीकडे वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क फ्रॅक्चर होऊन बाहेर पडताच आॅस्ट्रेलियाला जबर धक्का बसला. त्याची जागा पॅट कमिन्सने घेतली. २०११ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध पदार्पणात सात बळी घेणा-या कमिन्सने त्यानंतर मात्र कसोटी सामना खेळलेला नाही. त्याला उद्या संधी मिळण्याची शक्यता आहे. मिशेल मार्श हा देखील मायदेशी परतल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला संधी मिळण्याची शक्यता आहे. अबुधाबी येथे नोव्हेंबर २०१४ मध्ये खेळलेला मॅक्सवेल त्यानंतर एकही कसोटी खेळला नाही. आॅफ स्पिनर नाथन लियोनच्या बोटाला दुखापत असली तरी तो खेळेल, असे संघ व्यवस्थापनाने सांगितले.
(वृत्तसंस्था)
उभय संघ
भारत: विराट कोहली (कर्णधधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, करुण नायर, जयंत यादव, कुलदीप यादव आणि अभिनव मुकुंद.
ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एश्टन एगर, जॅक्सन बर्ड, पॅट कमिन्स, पीटर हॅण्डस्कोम्ब, जोश हेजलवुड, उस्मान ख्वाजा, नाथन लियोन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह ओकिफी, मॅट रेनशॉ, मार्कस स्टोयनिस, मिशेल स्वीपसन आणि मॅथ्यू वेड.