नाशिक : एरवी दररोज दिवस उजाडताच शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये भाजीवाल्याचा आवाज गुंजतो, मात्र मंगळवारी सकाळी हा आवाज नाशिककरांच्या कानी पडलाच नाही, कारण शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी दिल्लीतून पुकारलेल्या 'भारत बंद' या आंदोलनात कानाकोपऱ्यातील शेतकरी सहभागी झाला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर जाणे पसंतच केले नाही. शेतमालाचा उठाव होऊ शकला नाही, आणि बाजार समित्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा शेतमाल बळीराजाने पोहचविला नाही, यामुळे नागरिकांची चांगलीच फजिती झाली.
नाशिकरोडमधील बिटको चौकात उड्डाणपूलाखाली भाजी बाजाराची लगबग दिसली नाही. सातपूरच्या भाजी मंडईदेखील ओस पडलेली होती. साईनाथनगर भाजाी बाजारही सकाळी भरला नाही. भद्रकाली भाजी बाजारातही शुकशुकाट दिसून आला. भाजीपाला नाशिककरांना मिळणे मुश्कील झाले होते. यामुळे बहुतांश चाकरमान्यांनासुध्दा आज डब्यांमध्ये कुठल्याहीप्रकारच्या पालेभाज्या मिळू शकल्या नाहीत.