पोषण आहार मानधन खात्यासाठी धावपळ
सिन्नर : शासनाने पोषण आहार योजनेंतर्गत उन्हाळ्याच्या सुटीतील मानधन विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे पत्रक काढले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांची अवस्था खाते उघडण्यासाठी केविलवाणी झाली आहे. विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी पालकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांसाठी कागदपत्रे जमा करण्यासाठी पालक विविध ठिकाणी चकरा मारत आहेत.
विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्सची माहिती
सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक परिसरातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन शालेय अभ्यासाबरोबरच ब्रिज कोर्सची माहिती देत आहेत. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाही तसेच रेंजही नसल्यामुळे ऑनलाइनची कोणतीच सुविधा नाही. ४५ दिवसांत ब्रिज कोर्स पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याने १०-१० चे गट तयार करण्यात आले आहेत. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कारवान व्हॅनद्वारे स्वच्छता, कोरोना जनजागृती
सिन्नर : स्वच्छता व कोरोना जनजागृती करण्यासाठी ‘सेव द चिल्ड्रन- बालरक्षा भारत’ या संस्थेने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी तयार केलेल्या ‘कारवान’ व्हॅनचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आरोग्य विभाग व सेव द चिल्ड्रन यांच्या सहकार्याने हा जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, डॉ. लहू पाटील, अनिल निरगुडे, डॉ. प्रणोती सावकर उपस्थित होते.
इंटरनेट सेवा सुरळीत करण्याची मागणी
सिन्नर: गेल्या महिन्यापासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असल्याने इंटरनेट सुविधा सुरळीत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे, महिला तालुकाध्यक्ष अॅड. भाग्यश्री ओझा, वैभव शिरसाठ, रमेश साळवे यांनी बीएसएनएलचे अधिकारी कुमार यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला. सेवा विस्कळीत असल्याने विद्यार्थी, बॅँका, पतसंस्था यांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.