नाशिक : शहरातील एका रुग्णालयात गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मयत महिलेच्या नातेवाइकांनी संबंधित रुग्णालयावर कारवाईची मागणी करीत मुंबई नाका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.३१) ठिय्या दिला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी आंदोलन मागे घेतले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात किरण शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ओझर येथील किरण मोतीलाल शिरसाठ यांच्या पत्नी वर्षा शिरसाठ गरोदरपणात शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या.परंतु उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना शहरातील अन्य रुग्णालयांत हलविण्यात आले. परंतु, तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मयत वर्षा शिरसाठ यांचे पती किरण शिरसाठ यांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणातून चुकीचे उपचार केल्यानेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणात रुग्णालयावरव उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी मयत महिलेच्या नातेवाइकांसह ओझर येथील नागरिकांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यावर गर्दी केली होती, तर काही महिलांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावर निर्माण झाले. परंतु, पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने शिरसाठ कुटुंबीयांसह नागरिकांनी संयमी भूमिका घेतल्याने वातावरण शांत झाले.
गरोदर महिलेच्या मृत्यूने तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:47 IST