नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात येणाऱ्या आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्काराच्या निवडीला अखेर गुरुवारी (दि.१) मुहूर्त सापडला. शासकीय कन्या शाळेत अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आदर्श शिक्षकांचे प्रस्ताव अंतिम करण्यात आले.दरवर्षी जिल्ह्यातून १५ तालुक्यांतून १५ आदर्श शिक्षकांची निवड केली जाते. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. मागील वर्षी जरा उशिरानेच झालेल्या एका सोहळ्यात आदर्श शिक्षकच नव्हे तर विभागातील पुरस्कारांचे एकत्रित वितरण करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी पुरस्काराचे वितरण होणे अवघडच आहे. बैठकीस अध्यक्ष विजयश्री चुंभळे, शिक्षण सभापती किरण पंढरीनाथ थोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उर्मिला धनगर, शासकीय अध्यापिका महाविद्यालयाच्या प्राचार्य सरोज जगताप आदि उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी २८ प्रस्ताव आले आहेत. त्यातील १५ प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले. दि. ५ सप्टेंबरपूर्वी ते जाहीर करण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शिक्षक पुरस्काराच्या निवडीला अखेर सापडला मुहूर्त
By admin | Updated: September 2, 2016 00:25 IST