त्र्यंबकेश्वर : कुंभमेळ्यातील पहिल्या शाहीस्नानासाठी आखाड्यांबरोबर आलेल्या अस्सल साधंूबरोबर संधिसाधूंची संख्याही लक्षणीय होती. त्यांच्यामुळेच शाहीस्नान व दर्शनास विलंब झाला. साधूंच्या मिरवणुकीत सर्वसामान्यांना प्रवेशबंदी असताना हे संधिसाधू कसे आलेत हा प्रश्न सर्वांना पडला होता. नागासाधूंच्या मिरवणुकीत सर्वसामान्य स्त्रिया व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पहिल्या तीन आखाड्यांच्या शाही मिरवणुकींमध्ये सर्व सामान्य भक्तांची संख्या अधिक असल्याने निर्धारित वेळा पूर्ण करण्यासाठी पोलिसांना ठिकठिकाणी भाविकांची अडवणूक करावी लागली. अशावेळी पोलीस मुख्यालयातून संपूर्ण गावात स्पिकरद्वारे नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था असूनही त्यांचा वापर करण्याचा विसर पडलेला दिसत होता. भाविकांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्या असत्या तर पहिल्या आखाड्यापासून गोंधळ टळला असता. कुंभमेळ्यात प्रथमच शाहीमार्गाच्या दुतर्फा भाविकांसाठी उभारलेल्या बॅरिकेड््स निर्मनुष्य दिसत होत्या. शाहीमार्गावर रात्रीपासून दुपारी १२ पर्यंत भाविकांना निर्बंध घालण्यात आले.त्यामुळे हा कुंभमेळा भाविकांसाठी नाहीच का? असा सवाल उपस्थित होत होता. मध्यरात्री स्थानिक महिलांनी शाहीमार्गावर रांगोळ्या काढल्यानंतर त्या मिटवून पुन्हा काढाव्या लागल्या. कारण कुशावर्ताचा परिसर धुवून झाल्यानंतर पाऊणतासाने शाहीमार्ग धुण्यास प्रारंभ करण्यात आला.गावात ठिकठिकाणी एलइडीवॉल लावण्यात आले आहेत. पहाटेपर्यंत ते बंद असल्याने ते नक्की कशासाठी उभारलेत? असा प्रश्न भाविकांना पडला होता. पहाटे एलईडी स्क्रीन सुरू झाल्यानंतर कुशावर्त तीर्थावरील शाहीस्नान बघायला मिळेल अशा अपेक्षेने एलइडीकडे पाहणाऱ्या भाविकांना नाशिकच्या साधुग्राममधील जुनेच देखावे, विकासगाथा बघत बसावे लागले.सर्वसामान्य नागरिकांना थोपविण्यासाठी पोलिसांनी परोकोटीचा संयम बाळगलेला दिसत होता. त्या संयमालाच यश येऊन केवळ साधू-महंतांनीच कुशावर्तात स्नान केले. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेतर्फे आखाड्याच्या साधू-महंतांवर पुष्पवृष्टी आणि पुष्पमाला अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)
त्र्यंबकला संधिसाधूंची मांदियाळी
By admin | Updated: August 29, 2015 23:46 IST