त्र्यंबकेश्वर : तळवाडे हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असल्याने गावात विविध योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी उपसरपंच रोहिदास बोडके यांच्या नेतृत्वाखाली खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेऊन ग्रामपंचायत हद्दीत करावयाच्या विकासकामांबद्दल साकडे घातले.येथील गाव अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, रतनवाडीत अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, गावात सामाजिक सभागृह बांधणे, सभामंडप उभारणे, दशक्रिया विधी शेड, वाचनालय, सांस्कृतिक बहुउद्देशीय इमारत, स्मशानभूमी गंगाघाट, किकवी नदीवर व गौतमी गोदावरी नद्यांवर प्रत्येकी एक एक सीमेंट प्लग बंधारा बांधणे, व्यायामशाळा आदिंबाबत निवेदन दिले. या निवेदनाच्या प्रति जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक गटविकास अधिकारी आदिंना देण्यात आल्या आहेत. यावेळी उपसरपंच रोहिदास बोडके, धनंजय बोडके, रामा बोडके, कचरू बोडके, तानाजी बोडके, गणपत बोडके, युवराज ठाकरे (ग्रामसेवक), सुनील बोडके, सुरेश बोडके आदि उपस्थित होते. विशेष म्हणजे या गावात पाण्याची टंचाई नसून येथील ग्रामपंचायत विहिरीला भर उन्हाळ्यात मुबलक पाणी असते. विद्युत दीप चालू बंद करणे व पाणीपुरवठा हाताळणी स्वत: उपसरपंच नेमाने करतात, असे ग्रामस्थांनी सांगितले. वरील विकासकामे केल्यास गावाचा विकास होईल, असे बोडके यांनी सांगितले.(वार्ताहर)