नाशिक: गुन्हेगारीचे गालबोट लागलेल्या टाकळी, उपनगर परिसराचा कायापालट होत असताना, पुन्हा एकदा गुंडांच्या टोळ्यांमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षिता निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस फोफावणारी गुंडागर्दी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आउट’ राबवून खाकीचा धाक निर्माण करण्याची अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.
टाकळी, उपनगर, तसेच गांधीनगर परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. या परिसरात व्यावसायिक संकुले, रेसिडेन्शल कॉम्प्लेक्स, खेळाची मैदान, उद्याने विकसित झालेली आहेत. अनेक व्यावसायिक या परिसराकडे आकर्षित होत असल्याने, व्हेजिटेबल मार्केट, शॉपिंग मॉल्स, क्लासेस, बँका अशा सुविधा जवळ येत आहेत. मात्र, दुसरीकडे स्थानिक गुंड टोळ्यांमध्ये वर्चस्वातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. खुलेआम रस्त्यात हाणामारी, लूटमार करणे, चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे, तसेच सुसाट वेगाने दुचाकी चालवून अरेरावी करणाऱ्या तरुणांच्या टोळक्यांनी हैदोस घातला आहे. या परिसरातील चौकांमध्ये गुंडांचे टोळके उभे राहून दादागिरी करीत असल्याने, महिला आणि मुलींना असुरक्षित वाटू लागले आहे. दुकानदारांना धमकाविण्याचे प्रकारही गेल्या काही दिवसांत घडले आहे.
या परिसरात इतर शहरातील तडीपार गुंडांना आश्रय दिला जात आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारचे संशयास्पद वास्तव्यास आले आहेत. रात्री-अपरात्री अनेक टवाळखोर परिसरातील इमारतींची टेहाळणी करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. गुंडांच्या टोळ्यांमध्ये आपसात भडकेही उडण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उपनगरसारख्या विस्तारणाऱ्या परिसरात पोलीस फिरकत नसल्यान गुंडांचे फावले आहे. नियोजित पोलीस स्थानकाची जागा अजूनही पडून आहे, तर पोलीस चौकी बंद करण्यात आल्याने, पेालिसांना धाक वाटत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.