स्वराज्याचे तोरण बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज, सुराज्याचा वारसा तेवत ठेवणारे धर्मवीर संभाजी राजे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. एवढे महान कार्य विभूतींच्या नावासोबत आजच्या नीतिमूल्यांचा लिलाव मांडणाऱ्या राजकारण्यांचे नाव जोडण्याचा उद्योग त्यांच्या काही अंध समर्थकांनी सुरू केला आहे. प्रमोद जठार नामक एका समर्थकाने नारायण राणे यांच्या अटक प्रसंगाची तुलना धर्मवीर युवराज छत्रपती संभाजीराजे यांना आक्रमक, लुटारू मुघल बादशहाने केलेल्या अटकेशी करून खोडकरपणा केला आहे. त्यांच्या या कृतीने महाराष्ट्राच्या मातीच्या अस्मितेचा अवमान तर झालाच; शिवाय कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांनाही अप्रत्यक्षपणे अन्याय करणाऱ्या मुघल सैन्याची उपमा दिली आहे. अशा राजद्रोहाला प्रेरक कृत्य करणाऱ्या बेकायदेशीर प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर, प्रमोद जाधव, किरण डोके, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, गणेश वाकचौरे, योगीराज पाटील आदींनी केली आहे.
(फोटो २७ छावा) - छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांना देताना करण गायकर, प्रमोद जाधव, किरण डोके, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, गणेश वाकचौरे, योगीराज पाटील आदी.