नाशिक : शासकीय धान्याच्या लागोपाठ होणाऱ्या घोटाळ्यात थेट गुदामपालांचाच सहभाग आढळून आल्याने त्यावर उतारा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ जिल्ह्णातील सर्व गुदामपालांच्या तडकाफडकी बदल्या केल्या असून, त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सर्वच तहसीलदारांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संपर्क साधून धान्य घोटाळ्यासारख्या घटना टाळण्यासाठी अनेक उपाययोजनांची चर्चा केली होती. त्यात गुदामांवर व्हिडीओ कॅमेरे बसविण्याबरोबरच गुदामपाल व भ्रष्ट रेशन दुकानदार यांची साखळी तोडण्यासाठी गुदामपालांच्या दर तीन महिन्यांनी बदल्या करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणीचा भाग म्हणून गुदामपालांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्णात सतरा धान्य गुदामे असून, तेथे नियुक्त गुदामपालांना मूळ नेमणुकीच्या ठिकाणी पाठविण्यात आले, तर त्यांच्या जागी अन्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने यासंदर्भातील आदेश गुरुवारी काढण्यात आले. बदली झालेल्या गुदामपालांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असेही आदेशात म्हटले आहे.
गुदामपालांच्या तडकाफडकी बदल्या
By admin | Updated: March 20, 2015 00:07 IST