अंजनेरीच्या राखीव वनात शिरकाव करत धुमाकूळ घालणाऱ्या भटक्या श्वानांच्या झुंडीने येथील एका माकडाला चोहोबाजूंनी घेरत हल्ला केला. या हल्ल्यात श्वानांनी माकडाच्या मानेला तसेच डोक्यावर आणि पोटावर चावा घेतला. डोक्यात खोलवर दात लागल्याने माकड गंभीर जखमी झाले होते. प्रचंड रक्तस्राव होऊन अत्यवस्थ अवस्थेत माकड असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. तत्काळ वन कर्मचाऱ्यांनी ‘इको-एको’चे वैभव भोगले, सागर पाटील या वन्यजीवप्रेमींशी संपर्क साधून माकडाला सुरक्षितरीत्या शनिवारी (दि.२३) रेस्क्यू केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यास जागेवर प्रथमोपचार दिल्यानंतर माकडाला उंटवाडीच्या वनविश्रामगृहात हलविण्यात आले. तेथे शुश्रुषा केल्यानंतर माकडाची प्रकृती स्थिर होताच सोमवारी (दि.२५) माकडावर पशूंच्या दवाखान्यात सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी पवार व वेंडे यांनी माकडाला भुलीचे औषध देत गंभीर स्वरूपाच्या जखमेवर औषधोपचार करत शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर माकडाला वनविश्रामगृहात आणण्यात आले. माकडाची दुपारी भूल उतरल्यानंतर त्यास फलाहार वन्यजीवप्रेमींकडून देण्यात आला. माकडाचा जीव आता धोक्याच्या बाहेर असून सुमारे दहा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर जखमेचे टाके उघडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तोपर्यंत हे माकड वनविभागाचा पाहुणचार घेत विश्रामगृहात आराम करणार आहे.
---
फोटो आर वर २५मंकी/मंकी१ नावाने सेव्ह आहे.