वणी : जगदंबा मंदिर परिसरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. १ आॅक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला जगदंबा देवी मंदिरात प्रारंभ होत आहे. याठिकाणी प्रतिदिन २५ हजार भाविकांची उपस्थिती असते. नवरात्रोत्सव काळात दोन हजारांपेक्षा अधिक महिला नवसपूर्तीसाठी घटी बसतात. हजारो कावडधारक दर्शनासाठी हजेरी लावतात. दोन लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती असते. वाहतुकीची कोंडी होऊ नये व गर्दीचे नियोजन, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी याबाबतच्या सूचना पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी दिल्या. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असणारी सप्तशृंगदेवीची मोठी भगिनी म्हणून जगदंबा देवी परिचित असून, गडावर केलेला नवस जगदंबामातेला फेडता येतो; मात्र जगदंबेचा नवस जगदंबेपुढे फेडावा लागतो. यासाठी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक यात्रा काळात हजेरी लावतात. त्यामुळे वणी शहरात प्रवेश करून मंदिरापर्यंत जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीच्या नियोजनासाठी व यात्रोत्सव यशस्वीतेसाठी आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती पाटील यांनी दिली. दरम्यान, जगदंबा देवी मंदिर न्यास समितीने मंदिर परिसराची स्वच्छता व सुशोभिकरण केले आहे. तसेच तलावात आकर्षक कारंजाची व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर )
जगदंबा मंदिर परिसराची पाहणी
By admin | Updated: September 25, 2016 23:53 IST