नाशिक : समता अभियानचे अध्यक्ष खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मराठा समाजाचा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास आपला पाठिंबा आहे. मात्र, सरकारने आर्थिक निकषांनुसार आरक्षण द्यायचे की, सामाजिक द्यायचे याविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आवाहन मुणगेकर यांनी केली. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना मुणगेकर यांनी मराठा समाजाला समता अभियानच्या वतीने पाठिंबा जाहीर केला असून, सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांना गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली, तर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे अथवा या कायद्यातील दुरुस्तीचे अधिकार संसदेच्या कार्यकक्षेत असून, या कायद्याच्या दुरुपयोगाचे पुरावे सादर करणे यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे ते म्हणाले. कोपर्डीतील बलात्कराच्या घटनेवर बोलताना त्यांनी कोपर्डी गावातील शांततेचा सर्वांनी आदर्श घेण्यासारखे असल्याचे मत व्यक्त केले. तंटामुक्त समितीच्या माध्यमातून या गावातील दोन्ही गटांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. यातून सर्व समाजाने सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. राज्यातील विविध जिल्ह्यातून मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी निघालेले मोर्चे शांततेत निघत असून, स्वागतार्ह आहेत, परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे.
मराठा आरक्षणाला पाठिंबा
By admin | Updated: September 21, 2016 01:09 IST