नैराश्याची लक्षणे, वागण्यातील वैचित्र्यपूर्ण बदल, मरणाचे विचार किंवा मत प्रदर्शित करणारे, निरवानिरवीची भाषा तसेच कृती करणाऱ्या व्यक्ती आपल्या आसपास आढळल्यास त्याच्याशी संबंधिताने स्वत: मनमोकळेपणाने बोलून तसेच मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी केले. जगभरात होणाऱ्या आत्महत्यांमध्ये ७० टक्के प्रमाण पुरुषांचे तर ३० टक्के महिलांचे प्रमाण असते. देशात दिवसाला ३८१ आणि तासाला १६ तर प्रत्येक साडेतीन मिनिटाला १ व्यक्ती आत्महत्या करते. इतके हे प्रमाण भयावह असून दररोज युवा २८ विद्यार्थ्यांची होणारी आत्महत्या आणि त्या प्रमाणात सातत्याने पडत चाललेली भर चिंताजनक असल्याचेही डॉ. सोननीस यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्यासमवेत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर, डॉ. उमेश नागापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
इन्फो
आर्थिक दुर्बलतेसह नैराश्य मुख्य कारण
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये नैराश्य आणि आर्थिक तंगी, दुर्बलता ही सर्वाधिक प्रमुख कारणे असल्याचेही पाहणीतून दिसून आले आहे. देशात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ६६ टक्के गरीब, २९ टक्के मध्यमवर्गीय आणि ५ टक्के उच्च मध्यमवर्गीय तसेच श्रीमंत असे हे प्रमाण आहे. मानसिक आरोग्य कायदा २०१७ च्या उपकलमानुसार आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला तीव्र मानसिक तणाव असल्याने त्यांच्या उपचार आणि पुनर्वसनाची जबाबदारी ही शासनाची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
इन्फो
जनजागृतीसाठी सायकल राईड तसेच दीपप्रज्वलन
‘आयएमए’च्यावतीने आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी रविवारी सायकल राईडचे आयोजन करण्यात येणार आहे तर शुक्रवारी सायंकाळी प्रत्येक नागरिकाने घराच्या खिडकीत दिवा लावून मनोविकारांसाठी कार्य करणाऱ्या डॉक्टरांना तसेच आत्महत्येच्या विचारांतून जाणाऱ्यांना मनोबळ द्यावे, असे आवाहन ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. सोननीस यांनी केले.