निकवेल : विठेवाडी सहकारी साखर कारखान्याला (व.सा.का.) निकवेल येथील शेतकरी ऊसपुरवठा करणार असल्याचे आश्वासन निकवेल येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी दिले.वसाका कारखान्याची चाके पुन्हा फिरणार असल्याचे चित्र स्पष्ट होताच वसाकाचे बॉयलर पेटल्याने आमदार राहुल आहिरे, संतोष मोरे, कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक देवरे, शेतकी सुपरवायझर भिवराज सोनवणे, अरविंद सोनवणे, वसाकाचे माजी संचालक बाळासाहेब बिरारी आदि माजी संचालकांनी बागलाण पश्चिम पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यामध्ये कंधाणा, निकवेल, डांगसौंदाणे, किकवारी आदि गावांमध्ये बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी वसाकाच्या गव्हाण पूजेला निकवेल येथूनच ऊस घेऊन पूजन केले जाईल, असे आश्वासन आमदार राहुल अहेर यांनी दिले. तसेच पुढील काळातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे लक्ष द्यावे व जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.एफआरपीनुसार जो भाव निघेल तो भाव देण्यास वसाका कारखाना कटिबद्ध राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाच्या भुलथापांना बळी पडू नये. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वसाका कारखाना आपलाच आहे असे समजून वसाका कारखान्याला ऊस पुरवावा व पुढील वर्षी जास्तीत जास्त उसाची लागवड करण्याचे आवाहन यावेळी आमदार राहुल अहेर यांनी केले. यावेळी शिवाजी सोनवणे, अरुण सोनवणे, शिवाजी वाघ, नानाजी वाघ, यशवंत सोनवणे, सुनील वाघ, मधुकर बच्छाव आदि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
निकवेलचे शेतकरी पुरवणार वसाकाला ऊस
By admin | Updated: January 4, 2016 23:57 IST