येवला : येवल्यात तीव्र पाणीटंचाईसह चाराटंचाईचे संकट गहिरे झाले आहे. जनावरेदेखील अर्धपोटी राहत आहेत. या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जनावरांना आता निफाड तालुक्यातील उसाच्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. चढ्या दराने उस खरेदी करून जनावरांचे पोट कसेबसे भरण्याची कसरत शेतकरी करीत आहेत. येवला तालुक्यात ५९ गावे व ४३ वाड्यांना ३२ टँँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याची सोय होत असली तरी, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर बनला आहे. शिवाय जनावरे चाऱ्याअभावी अर्धपोटी राहत आहेत. अनेक वेळा चारा छावणीसाठी निवेदने दिली, आंदोलने झाली; परंतु तालुक्यात कोठेही लोकप्रतिनिधी अथवा शासनाकडून चाऱ्यासाठी उपाययोजना झाल्या नाहीत. तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून, आता केवळ पाऊसच पशुधन वाचवू शकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही प्रमाणात शेतकऱ्यांनी सांभाळलेला कडबा, सरमड, भुसा संपला आहे. जनावरांसाठी आता निफाड भागातून ऊस विक्रीला आणला जात आहे. महागडा ऊस परवडत नसला तरी पर्याय उरला नसल्याने येवला-मनमाड रस्त्यावर तालुका व तालुक्याबाहेरील शेतकरी ऊस विक्री करण्यासाठी आणीत आहेत. निफाड तालुक्यातून २८०० रुपये टनाने आणलेला ऊस येवल्यात ३४०० रुपये टन विकला जात आहे. खर्च वजा जाता ऊसविक्रेत्यांना केवळ रोजंदारी सुटत आहे. गरीब पशुपालकांना महागडा ऊस घेणे परवडत नाही.परंतु दुभती जनावरे पोट भरल्याशिवाय दुधाला कशी उतरणार म्हणून महागडा का असेना शेतकरी ऊस विकत घेऊन जनावरांना वैरण ठेवत आहे. वजनकाट्यावरील वजनाचे पैसे वाचवण्यासाठी एका उसाच्या मोळीच्या आकारावरून वजन गृहीत धरून एका टनात ५५ ते ६० मोळ्या बसण्याच्या अंदाजाने विक्र ी होत आहे. (वार्ताहर)
येवल्याच्या जनावरांना निफाडच्या उसाचा आधार
By admin | Updated: June 5, 2016 23:31 IST