नाशिक- भूमापनासाठी माैजे नाशिकमध्ये येणाऱ्या द्वारका परिसरातील काही भागात भूमापन अधिकाऱ्यांनी सर्व्हे करताना थेट नागरिकांना तुमच्या मिळकतीवर सरकारी दावे असल्याची अजब नोटीस पाठवल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. नागरिकांना प्रॉपटी कार्ड देण्यासाठी ही नोटीस असेल तर तशा सूचना दिल्या पाहिजे. अशाप्रकारे दंडेलशाहीची भाषा वापरली तर एखाद्याला हृदयविकाराचा धक्का येऊ शकेल, अशी भीतीदेखील नागरिकांनी व्यक्त केले.
शहरातील द्वारका चौफुलीत दोन दिवसांपासून भूमापन अधिकाऱ्यांमार्फत नोटीस बजावली जात आहे; परंतु नोटीस बजावणारे कर्मचारी नागरिकांना पुरेशी माहिती न देता येथे कोण राहते, असे विचारून नेाटीस बजावत असून त्यांच्याकडे मात्र या भागात कोण राहते त्यांच्या मिळकतींची कागदपत्रे नाहीत की यादी नाही, अशी अवस्था आहे. त्यातच परंपरागत नोटीसची भाषा अत्यंत गोंधळात टाकणारी असून, सरकारने आपल्या मिळकतीवर दावा केला आहे आणि ती मिळकत आपली आहे, हे सिद्ध करण्यासाठी पुरावे घेऊन उपस्थित राहावे, अशा प्रकारे नोटीस बजावण्यात आल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
कोट..
सरकारी यंत्रणेचे उद्दिष्ट चांगले असेल; परंतु त्यासाठी कार्यपद्धतीही तशीच हवी. चांगल्या प्रकारे माहिती दिली तर नागरिक सहज सूचनांचे पालन करू शकतील.
- वसंत राऊत, सामाजिक कार्यकर्ते
कोट..
सरकारी यंत्रणेने अशाप्रकारे नागरिकांना भयभीत करणारी भाषा वापरू नये. जर भूमापन करून नागरिकांनाच त्यांच्या प्रॉपटीचे कार्ड द्यायचे असेल तर साधी सोपी सूचना देणारी भाषा असली पाहिजे. अशाप्रकारच्या धक्कादायक सरकारी भाषेमुळे एखाद्या नागरिकाच्या जीवावर बेतू शकते.
देवीदास पाटील, रहिवासी, वैद्यनगर
कोट...
सरकारी यंत्रणेने कार्यपद्धती बदलली पाहिजे. भूमापन करायचे असेल तर त्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांना पाठवले आहे, त्यांना पुरेशी माहिती घेऊन पाठवले पाहिजे. अपुरी माहिती आणि त्यातच सरकारी भाषा अशी असेल तर त्यातून काम घडण्यापेक्षा बिघडू शकते.
- अभिजीत काेल्हे, रहिवासी, द्वारका