उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर नाका येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. उपनगर नाका परिसरात सातत्याने होणारे अपघात, बेशिस्त वाहनचालकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी याकरिता सिग्नल बसविण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, रहिवासी व वाहनधारकांकडून केली जात होती. मात्र जनतेच्या या रास्त मागणीकडे मनपा व पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने काही दिवसांपूर्वीच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर मनपाकडून उपनगर नाका येथे सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली होती. सोमवारी सकाळपासून उपनगर नाका येथील सिग्नल यंत्रणा यशस्वीपणे सुरू झाली. यामुळे बेशिस्त वाहनधारकांना लगाम लागला असून, वाहतुकीची कोंडीचा प्रश्नदेखील बऱ्याच प्रमाणात मार्गी लागला आहे. उपनगर नाका येथील दोन्ही बाजूचे बसथांबे हे वाहतुकीला अडथळे ठरत असून, बस थांब्यांचे स्थलांतर करण्यात यावे व जयभवानी मार्गासाठी रॉँगसाईड जाणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
उपनगर सिग्नल अखेर कार्यान्वित
By admin | Updated: January 20, 2016 23:20 IST