निफाड : तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील दोन गावांच्या फाट्यावर नाशिक, येवला व लासलगाव आगाराच्या बसेस थांबण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. २५) सकाळी ९ वाजेदरम्यान शिंपी टाकळी फाटा येथे रास्ता रोको केला. सकाळी ९ वाजता अचानक शिंपी टाकळी फाट्यावर विद्यार्थ्यांनी जमा होत रास्ता रोको केल्याने सुमारे एक तास नाशिक-औरंगाबाद मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. परिवहन खात्याचे अधिकारी येऊन ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरूच राहील, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच सायखेडा ठाण्याचे पोलीस पथक व लासलगावचे आगारप्रमुख के. व्ही. धनवटे, सहायक आगारप्रमुख आर.के. कोपूलकर तसेच नाशिक शहर बस कार्यालयाचे आव्हाड, घुले आदि अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मागणीचे निवेदन सादर केले. ग्रामीण भागातील नागापूर व शिंपी टाकळी फाटा या थांब्यावर येवला, लासलगाव तसेच नाशिक येथून येणाऱ्या बसेस थांबत नाही. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घरी व शाळेत जाण्यास उशीर होतो. शहर बसचे वाहक पासधारक विद्यार्थ्यांची अडवणुक करतात त्यामुळे मोठी गैरसोय होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन सदर थांब्यावर बसेस थांबवाव्यात तसेच विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन बस फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी केली आहे. यावेळी शेकडांच्यावर विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. वरील दोन्ही गावच्या फाट्यावर बसेस थांबवून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली जाईल, असे आश्वासन लासलगाव डेपो व शहर बस वाहतूक अधिकाऱ्यांनी दिले़ (वार्ताहर)
चांदोरीत विद्यार्थ्यांनी केला रास्ता रोको
By admin | Updated: July 25, 2016 23:07 IST