नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुदान देण्यात येणाऱ्या परशुराम साईखेडकर नाट्यमंदिरानजीकच्या रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहाची काल (दि.१) समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांच्यासह महिला समिती सदस्यांनी अचानक तपासणी केली.या तपासणीत विद्यार्थिनींची नियमित आरोग्य तपासणी होत नसल्याचे व त्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले नसल्याचे समितीला आढळून आले. तसेच विद्यार्थिनींना एक किलोमीटर अंतरावरील शाळेत पायी चालत जावे लागत असल्याचे आणि विद्यार्थिनी संख्येच्या दृष्टीने स्वयंपाकी दोनच असल्याचेही आढळून आले. काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सभापती उषा बच्छाव यांच्यासह समिती सदस्य निर्मला गिते, इंदुमती खोसकर, तसेच समाजकल्याण विभागाचे निरीक्षक पी.व्ही. थोरात आदिंनी रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहास भेट दिली. वसतिगृहात पाचवी ते दहावीच्या एकूण १८० विद्यार्थिनींची संख्या पटसंख्येवर व प्रत्यक्षात सर्व विद्यार्थिनी हजर असल्याचे आढळून आले. विद्यार्थिनींना भौतिक सुविधा चांगल्या मिळत असल्याचे दिसून आले. शिष्यवृत्ती फी, सहलीची फी व स्काउट-गाइडची फी विद्यार्थिनी घरूनच पालकांकडून आणत असल्याचेही सभापती उषा बच्छाव यांनी विद्यार्थिनींशी केलेल्या चर्चेतून उघड झाले. यावेळी वसतिगृहात आवश्यक त्या सुविधा व विद्यार्थिनींची नियमित आरोग्य तपासणीच्या सूचना उषा बच्छाव यांनी वसतिगृह अधीक्षक प्रतिभा डेर्ले यांना दिल्या. (प्रतिनिधी)
विद्यार्थिनी वसतिगृह तपासले
By admin | Updated: April 2, 2015 00:47 IST