धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करावी
नाशिक : कोविडच्या काळात रस्त्यावर थुंकणाऱ्यांमुळे संसर्ग पसरण्याची भीती असूनही नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, कोणीही नियमांचे पालन करण्याच्या मानसिकतेत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी धूम्रपान करून रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सर्व रिक्षाचालकांना मिळावी मदत
नाशिक : लॉकडाऊनच्या कालावधीत, तसेच त्यापूर्वीच्या काळातही रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे महानगरातील पंचवीस हजारांहून अधिक रिक्षाचालकांना त्यांच्या कुटुंबांचे पालनपोषण करणाऱ्या रिक्षाचालकांची कुटुंबे अडचणीत सापडले आहेत. भाडेतत्त्वावर गाडी चालविणाऱ्या चालकांची तर प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे सर्वच रिक्षाचालकांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मोबाईल अतिवापराने नेत्रविकाराची भीती
नाशिक : कोरोनाच्या निर्बंधांमुळे मुले घरातच बंद आहेत. त्यामुळे मोबाईल, टॅब, लॅपटॉपच्या वापरासह टीव्ही पाहण्यातच त्यांचा सर्वाधिक वेळ जात आहे. त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाईम वाढला असून, त्यांना नेत्रविकार जडू लागले असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आईस्क्रिम, लस्सी व्यवसाय थंडावला
नाशिक : शहरात निर्बंधांमुळे केवळ उन्हाळ्यात आणि त्यातही मे महिन्यात सर्वाधिक व्यवसाय होणारा आईस्क्रिम पार्लर चालक तसेच लस्सी विक्रेते, ताक विक्रेत्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. आईस्क्रिमसह सर्वच प्रकारच्या थंड पदार्थांचे सेवनही नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने कमी केले असून, त्यात मेच्या मध्यावरच पाऊस येऊन गेल्याने यंदाच्या वर्षीही पूर्ण सिझन वाया गेला आहे.
लघु व्यावसायिकांना आर्थिक मदतीची मागणी
नाशिक : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे शहरातील अनेक उद्योग, व्यवसाय संकटात सापडले आहेत. निर्बंध काहीसे शिथिल केले तरी त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. या संकटातून उभारी घेण्यासाठी सरकारने लघु व्यावसायिकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
समांतर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे
नाशिक : मुंबई-आग्रा रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येते. रस्त्याच्या अगदी मधोमध खड्डे पडल्याने नागरिकांना अपघाताची भीती वाटते. त्यामुळे या मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी सातत्याने होत असल्याने तातडीने रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.