नाशिक - शहरात ब्रिटिशांच्या राजवटीत उभ्या राहिलेल्या तीन ऐतिहासिक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली असून तज्ज्ञ अथवा संस्थांकडून त्यासंदर्भात निविदा मागविण्यात आल्या आहेत. शहरात व्हिक्टोरिया तथा अहल्यादेवी होळकर पूल, वालदेवी नदीवरील देवळाली कॅम्पला जोडणारा पूल आणि जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील पूल या तीन पुलांचे हे आॅडिट केले जाणार असून त्यानंतर त्यांचे आयुष्यमान वाढविण्याचे प्रस्तावित आहे.आॅगस्ट २०१६ मध्ये रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीला आलेल्या पुरामध्ये महाड-पोलादपूरला जोडणारा ब्रिटिशकालिन पूल वाहून जाण्याची दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील सर्वच ब्रिटिशकालिन पुलांच्या स्थितीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. शासनाने या जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचेही आदेशित केले होते. नाशिक महापालिकेनेही शहरातील ब्रिटिशकालिन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, महापालिकेने आता त्यादृष्टीने पावले उचलली असून शहरातील तीन ब्रिटिशकालिन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी तज्ज्ञ-संस्थांकडून निविदा मागविल्या आहेत. शहरात गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला पूर्वाश्रमीचा व्हिक्टोरिया पूल सर्वात जुना मानला जातो. व्हिक्टोरिया पुल १४ जानेवारी १८९५ रोजी वाहतुकीसाठी खुला करुन देण्यात आला. या पुलाला १२२ वर्षे झाली असून २००३-०४ मध्ये या पुलाचे अहल्यादेवी होळकर पुल असे नामकरण झाले होते. पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली त्यावेळी पुलाचे बांधकाम करणा-या ब्रिटिश कंपनीने महापालिकेला पत्र पाठवून त्याचे आयुर्मान संपल्याची जाणीव करून दिली होती. त्यानंतर महापालिकेने डागडुजी करत या पुलावर फूटपाथ वाढवत त्यांना सिमेंटच्या पीलरचा आधार दिला होता. याशिवाय, या पुलाला समांतर असा जिजाऊ पूलही उभारण्यात आला. १२२ वर्षांनंतरही या पुलाचे सौंदर्य कायम असून तो वाहतुकीचा भार उचलत आहे. याशिवाय, वालदेवी नदीवरील देवळाली कॅम्पला जोडणारा आणि आडगावजवळील पुलही ब्रिटिशकालिन आहेत. या तिनही पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले जाणार आहे. त्यानंतर, सदर पुलांची दुरुस्ती व आयुर्मान वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत.अहवालानंतर कार्यवाहीशहरातील या तिनही पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले जाणार आहे. यापूर्वी पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट झालेले नाही. पुलाला कुठे भेगा, चिरा पडल्या आहेत काय, पुलाची वहनक्षमता या सा-या गोष्टींची तज्ज्ञांमार्फत पाहणी केली जाणार आहे. तज्ज्ञांच्या अहवालानंतर पुलांच्या दुरुस्तीविषयी युद्धपातळीवर कार्यवाही केली जाईल.- उत्तम पवार, शहर अभियंता, मनपा
नाशिक शहरातील ब्रिटिशकालीन तीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 15:24 IST
मनपाकडून कार्यवाही सुरू : तज्ज्ञांकडून मागविल्या निविदा
नाशिक शहरातील ब्रिटिशकालीन तीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार
ठळक मुद्देव्हिक्टोरिया तथा अहल्यादेवी होळकर पूल, वालदेवी नदीवरील देवळाली कॅम्पला जोडणारा पूल आणि जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील पूल या तीन पुलांचे हे आॅडिट केले जाणार गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला पूर्वाश्रमीचा व्हिक्टोरिया पूल सर्वात जुना