नाशिक : शहरातील मुख्य रस्त्यांवर दोन्ही बाजूला हातगाड्यांचे अतिक्रमण, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पार्किंग आणि त्यातच जागोजागी चौकात तसेच रस्त्यातच मध्यभागी भटक्या गायी-वासरांनी ठिय्या मांडल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. नाशिक शहरातील मध्यवर्ती भागासह सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटी तसेच नाशिकरोड या विभागांमध्ये वाहतूक व्यवस्थेची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होऊन अपघातात वाढ होत आहे. शहरातील जुना आग्रा महामार्ग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रोड, शिवाजीरोड, शालिमार, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, पंचवटी कारंजा आदी भागात रोजच वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. यामध्ये वाहनचालकांचा वेळ आणि पेट्रोल खर्च होत आहे. त्यातच रस्तोरस्ती ठाण मांडून बसलेली मोकाट जनावरे या वाहतूक कोंडीमध्ये मोठी भर टाकतात. मोकाट जनावरे हटविण्याचे काम मनपा अतिक्रमण विभागाने एका खासगी संस्थेला दिले आहे. तरीही शहरातील सर्वच भागात या मोकाट जनावरांचा ठिय्या दिसून येतो. सिडको भागात अगदी सकाळपासूनच ही जनावरे त्रिमूर्ती चौक, पवननगर चौक, शिवाजी चौक, राणाप्रताप चौक, मोरवाडीगाव, अंबडगाव, डीजीपीनगर या भागात भर रस्त्यातच मध्यभागी बसलेले असतात. साहजिकच वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होतात. याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.कोंडवाडे अडगळीतमोकाट जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेने भद्रकाली, पंचवटी, सातपूर आदी परिसरात कोंडवाडे ठेवलेले होते. परंतु सदर कोंडवाडे गंजलेले, तुटलेले आणि नादुरुस्त झालेले आहेत. पंचवटीतील कोंडवाडा अडगळीत असून, तेथे पावसाचे पाणी व चिखल साचल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या कोंडवाड्याच्या देखभालीची गरज निर्माण झाली आहे. शाळा सुटल्यावर रिक्षा, व्हॅन आणि पायी जाणारी मुले यांची गर्दी वाढते. त्यामुळे छोटे छोटे अपघात होऊन जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. यासंबंधी काही सामाजिक संघटनांनी महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाकडे तक्रार केली आहे.
भटक्या जनावरांचा रस्त्यावरच ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:22 IST