सातपूर : येथील औद्योगिक वसाहतीतील रस्त्याच्या कडेला अवजड कंटेनर्स उभे केले जात असल्याने रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. या कंटेनर्समुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कंटेनर्स हटवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बसपाच्या वतीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीतील रस्ता क्र. ६ मायको कंपनी समोरील रस्ता, रस्ता क्र. १६ व १७ तसेच अन्य रस्त्याच्या कडेला माल वाहतूक करणारे कंटेनर्स रस्त्याच्या कडेला उभे केले जातात. या कंटेनर्समुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. कारखान्यांमध्ये कामावर येणाऱ्या व घरी जाणाऱ्या कामगारांना या कंटेनर्समुळे अनेक वेळा अपघात झाला आहे. या अपघातात काहींना जीव गमवावा लागला आहे, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. मागील आठवड्यातदेखील कंटेनरच्या अपघातात २२ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला व दुसऱ्याला अपंगत्व आले आहे. याबाबत वाहतूक शाखेला अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या मागणीचे निवेदन बसपाचे जिल्हा अध्यक्ष बजरंग शिंदे, माजी नगरसेवक ज्योती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांना देण्यात आले. निवेदनावर कैलास सोनवणे, फकिरा शार्दुल, अशोक वावळे, रवि मोरे, हरिष सोनवणे, संतोष जाधव, गणेश झनकर, ज्ञानेश्वर बरावे, देवराम पगारे, देवीदास अहिरे, अशोक पवार, समाधान साळवे, प्रमोद वाघमारे, विठ्ठल साळवे आदिंसह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
कंटेनर्समुळे वाहतुकीला अडथळा
By admin | Updated: September 3, 2015 23:49 IST