नाशिक : गोदाघाट व रामकुंडावरील उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर तसेच अन्नदानाच्या निमित्ताने भाविकांची होणारी आर्थिक पिळवणूक तत्काळ रोखून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर युवक कॉँग्रेसच्या वतीने महापौर अॅड. यतिन वाघ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, पंचवटीत देवदर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. रामकुंडावर असलेल्या भिकाऱ्यांसाठी हे भाविक अन्नदान करतात. याच रामुकंडावरील गोदाघाटावर उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परराज्यातून आलेल्या भाविकांना अन्नदान करण्याच्या नावाखाली निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री करून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. केलेल्या अन्नदानातील बहुतेक पदार्थ तिथेच उघड्यावर पडलेले असतात. निकृष्ट अन्न असल्याने भिकारीही ते खात नाही. या सर्व प्रकारामुळे धार्मिक क्षेत्र असलेल्या पंचवटी परिसराला बकाल स्वरूप आले आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेला कुंभमेळा पाहता मोठ्या प्रमाणात भाविक नाशिकला येणार असून, पालिकेने याबाबत संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शहर युवक कॉँग्रेस उपाध्यक्ष तुषार जगताप, ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश मारू, वीरेंद्र भुसारे, गणेश राजपूत, संतोष पवार, सागर निकम आदिंनी केली आहे. (प्रतिनिधी)
अन्नदानाच्या निमित्ताने होणारी लूट थांबवा
By admin | Updated: July 18, 2014 00:33 IST