एकनाथ सावळा ल्ल मेशीसमाजातील दुर्बल - अतिदुर्बल घटकाच्या सर्वांगीण मदतीच्या दृष्टीने शासनस्तरावरून अनेक योजना राबविल्या जात असताना, त्यासाठीच्या निकषांची पूर्ती होत असतानाही केवळ शासनाच्या लालफितीच्या सावळ्या गोंधळामुळे पिवळ्या शिधापत्रिकाधारक व कर्करोगाने ग्रस्त असलेल्याचे नाव शासनाच्याच राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या यादीत नसल्याने त्यास इलाजापासून वंचित रहावे लागत आहे. एवढेच नाही, तर अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने पतीच्या खर्चासाठी पत्नीला धावाधाव करावी लागते आहे. निंबा शिरसाठ यांना कर्करोगाच्या दुर्धर आजाराने ग्रासले असून, साडेतीन ते चार लाख रुपयांचा खर्च उपचारासाठी लागणार आहे. त्यांच्या खर्चासाठी इतके रुपये उभे करणे शिरसाठ कुटुंबीयांना अशक्य आहे. याबाबत त्यांना शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेची माहिती मिळाल्यानंतर शिरसाठ यांच्या पत्नीने त्यासाठी प्रयत्न केले असता पिवळी शिधापत्रिका असतानाही त्यांचे नाव शासनाच्या लालफितीच्या सावळ्या गोंधळामुळे सदरच्या जीवनदायी योजनेमध्ये समाविष्टच करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना सदर योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. शिरसाठ यांच्या पत्नी नंदा यांनी याबाबत देवळा तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून त्यांची नावे शासनाच्या जीवनदायी योजनेत समाविष्ट करून त्यांच्या कर्करोगग्रस्त पतीचा इलाज व्हावा, अशी मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत शासनाकडून त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद लाभलेला नाही. त्यामुळे पतीच्या इलाजासाठी नंदा शिरसाठ यांच्यावर धावाधाव करण्याची वेळ आली आहे.
... तरीही जीवनदायीपासून वंचित
By admin | Updated: July 17, 2014 00:29 IST